तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव तिसर्‍या आघाडीच्या तयारीत | पुढारी

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव तिसर्‍या आघाडीच्या तयारीत

चंदीगड ; वृत्तसंस्था : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या तयारीत असून, विरोधी पक्षनेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. चंदीगडमध्ये रविवारी किसान संमेलनाच्या निमित्ताने त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवान मान यांच्यासोबत खलबते केल्याचे सांगण्यात येते.

तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष असलेले केसीआर तिसर्‍या आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवाराला आव्हान देण्याचा प्रयत्न करणार आहेत. रालोआतील घटक पक्ष जनता दल युनायटेडचे नेते तसेच बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनाही या तिसर्‍या आघाडीत समाविष्ट करण्याचा के. सी. राव यांचा प्रयत्न आहे.

केंद्राच्या कृषी सुधारणा कायद्यांविरोधातील आंदोलनादरम्यान मरण पावलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना तेलंगणा सरकारतर्फे प्रत्येकी 3 लाख रुपये मदत देण्याची घोषणाही राव यांनी केली. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांचीही भेट राव यांनी घेतली.

बंगळूरयेथे 26 मे रोजी जनता दल सेक्युलर पक्षाचे अध्यक्ष तसेच माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचीही भेट राव घेणार आहेत. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी 2019 च्या निवडणुकीत देवेगौडा यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर 28 मे रोजी राव पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहेत. मार्च 2018 मध्ये त्यांची फेडरल फ्रंट उघडण्याबाबत चर्चा झाली होती. राव यांनी महिनाभरापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली होती. केरळचे मुख्यमंत्री पिनााई विजयन यांनाही ते भेटले आहेत.

Back to top button