ऑपरेशन ‘खोजबीन’! समुद्रातील अमली पदार्थांची तस्करी रोखली, तब्बल १,५२६ कोटींचे हेरॉईन जप्त | पुढारी

ऑपरेशन 'खोजबीन'! समुद्रातील अमली पदार्थांची तस्करी रोखली, तब्बल १,५२६ कोटींचे हेरॉईन जप्त

लक्षद्वीप; पुढारी ऑनलाईन

समुद्रीमार्गे अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी महसूल गुप्तचर संचालनालयाकडून (Directorate of Revenue Intelligence) कारवाई सुरूच आहे. नुकत्याच केलेल्या एका कारवाईदरम्यान भारतीय तटरक्षक दलाच्या (Indian Coast Guard) जहाजांनी लक्षद्वीपच्या किनार्‍याजवळ प्रिन्स आणि लिटल जीझस नावाच्या दोन मच्छीमार बोटींचा पाठलाग केला आणि सुमारे १,५२६ कोटी रुपये किमतीच्या ड्रग्जसह त्या ताब्यात घेतल्या.

महसूल गुप्तचर संचालनालयासोबत संयुक्तपणे करण्यात आलेल्या ऑपरेशन ‘खोजबीन’ (Operation ‘Khojbeen’) दरम्यान ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या कारवाईवेळी जप्त केलेले अमलीपदार्थ हे हेरॉईन आहे.

अधिक मिळालेल्या माहितीनुसार, डीआरआय आणि भारतीय तटरक्षक दलाने ७ मे रोजी संयुक्तरित्या सर्च ऑपरेशन सुरु केले होते. त्याचे नाव ऑपरेशन खोजबीन असे ठेवण्यात आले आहे. अनेक दिवसांच्या सर्च ऑपरेशननंतर प्रिन्स आणि लिटल जीझस या दोन संशयित बोटींची माहिती मिळाल्यानंतर त्यांचा पाठलाग करण्यात आला. या दोन्ही बोटींना रोखण्यात आल्यानंतर त्यांची झडती घेण्यात आली. तर त्यात मोठ्या प्रमाणात हेरॉईनचा साठा आढळून आला. त्यानंतर या बोटींना कोची येथील तटरक्षक दलाच्या मुख्यालयापर्यंत नेण्यात आले. बोटींमधून हेरॉइनची २१८ पाकिटे जप्त करण्यात आली आहेत. सर्व पाकिटांत १ किलो हेरॉइन सापडले आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे १,५२६ कोटी रुपये एवढी किंमत आहे.

Back to top button