New Delhi: ‘ट्राय’ वर पंतप्रधानांनी जारी केले विशेष टपाल तिकीट | पुढारी

New Delhi: 'ट्राय' वर पंतप्रधानांनी जारी केले विशेष टपाल तिकीट

नवी दिल्ली पुढारी वृत्तसेवा : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या स्थापनेला (ट्राय) 25 वर्षे पूर्ण झाली असून यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विशेष टपाल तिकीट जारी करण्यात आले. यावेळी 5- जी टेस्टबेड देशाला समर्पित करण्याचा कार्यक्रमही झाला.

5 जी तंत्रज्ञानामुळे देशाच्या प्रशासनात तसेच व्यवसायात सकारात्मक बदल घडून येईल, असे प्रतिपादन मोदी यांनी यानिमित्ताने केले. गाव-गावापर्यंत तंत्रज्ञान पोहोचविण्यात 5 जी मोलाची कामगिरी बजावणार असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, तंत्रज्ञानामुळे शेती, आरोग्य, पायाभूत सुविधा, लॉजिस्टिकसह सर्व क्षेत्रातील विकासाला चालना मिळेल. शिवाय विविध क्षेत्रात रोजगार वृद्धीदेखील होणार आहे. ट्रायने आपली 25 वर्षे पूर्ण केली आहेत. दूरसंचार क्षेत्राच्या नियमनासाठी ट्राय दीर्घकाळापासून चांगले काम करत आहे.

वर्ष 2014 च्या आधी देशातील शंभर गावांमध्ये देखील ऑप्टिकल फायबर कनेक्टिविटी नव्हती. मात्र आता पावणे दोन लाख गावांपर्यंत ही जोडणी पोहोचली आहे, असे सांगत मोदी पुढे म्हणाले की, नक्षलग्रस्त भागात 4 जी सुविधा पोहोचविण्याची प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. आता सरकार सर्व समाजघटकांना सोबत घेऊन पुढे जात आहे. जनधन, आधार आणि मोबाईलच्या ट्रिनिटीला थेट गव्हर्ननन्सचे माध्यम बनविण्यात आले आहे.

हेही वाचा

Back to top button