

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह महाराष्ट्रातील पाच आणि देशभरातील एकूण 19 खासदारांनी राज्यसभेत सदस्यत्वाची शपथ घेतली. राज्यसभा सभापती तथा उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी राज्यसभा सभागृहात सर्व नव्याने निवडून आलेल्या खासदारांना शपथ दिली. 19 खासदारांमध्ये 5 सदस्य महाराष्ट्राचे, 6 सदस्य तामिळनाडूचे, 5 सदस्य पश्चिम बंगालचे आणि 3 सदस्य ओडिशाचे आहेत. खासदारांच्या शपथविधीप्रसंगी संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू, आदिवासी कार्य मंत्री जुएल ओराम, राज्यसभेचे महासचिव पी. सी. मोदी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
...या खासदारांनी घेतली शपथ
शपथ घेतलेल्या खासदारांमध्ये महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शरद पवार, रिपाइंचे रामदास आठवले, भाजपच्या माया इवनाते, रामराव वडकुते, शिवसेना शिंदे गटाच्या डॉ. ज्योती वाघमारे या 5 खासदारांचा समावेश आहे. यापैकी शरद पवारांनी हिंदीत तर इतर 4 खासदारांनी मराठीत शपथ घेतली.
ज्योती वाघमारे यांची शपथ लक्षवेधी
शिवसेना शिंदे गटाच्या खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी राज्यसभेची शपथ घेताना छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर या सर्व महापुरुषांच्या नावाचा उल्लेख केला. याशिवाय त्यांनी बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्याही नावाचा उल्लेख केला. मात्र शपथ घेताना कोणत्याही व्यक्तीचा उल्लेख न करण्याचा नियम असल्याने सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना थांबवले. त्यानंतर ज्योती वाघमारे यांना पुन्हा एकदा शपथ घेतली. वाघमारे यांची वेशभूषा लक्षवेधी होती. इरकल साडी, डोक्यावर पदर, हातात संविधान, कपाळावर आडवी चिरी अशी वेशभूषा त्यांनी केली होती.