दिल्ली येथे इमारतीला लागलेल्या भीषण आगीत २६ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : पश्चिम दिल्लीतील मुंडका मेट्रो स्टेशनच्या 544 क्रमांकाच्या पिलरजवळील एका इमारतीला शुक्रवारी दुपारी भीषण आग लागली. या अपघातात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 10 जण जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. आग एवढी भीषण होती की आगीने तीन मजली इमारतीला पूर्णपणे वेढले. दिल्ली पोलिसांना 4.40 वाजता पीसीआर कॉलद्वारे आगीची माहिती मिळाली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मुंडका दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल शोक व्यक्त केला आहे.
माध्यामांच्या माहितीनुसार, अनेक तासांच्या अथक परिश्रमानंतर सुद्धा आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरुच आहेत. दिल्ली अग्निशमन दलाचे संचालक अतुल गर्ग यांनी सांगितले की, शुक्रवारी संध्याकाळी दिल्लीच्या मुंडका मेट्रो स्टेशनजवळ तीन मजली व्यावसायिक इमारतीला लागलेल्या आगीत 26 मृतदेह सापडले आहेत. त्याचबरोबर इमारतीच्या तिसऱ्या मजल्याचा शोध घेणे बाकी आहे. आणखी अनेक मृतदेह सापडण्याची भीती आहे. इमारतीत अडकलेल्या ९ जखमींना संजय गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
मुंडका परिसरात लागलेल्या भीषण आगीतील मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. इमारतीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. दिल्लीचे डीसीपी समीर शर्मा म्हणाले की, बचावकार्य सुरू आहे. अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी हजर आहेत, आम्ही आणखी अग्निशमन दलाला पाचारण केले आहे. आम्ही आतापर्यंत 50-60 लोकांना वाचवले आहे.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. मात्र, आगीची तीव्रता पाहता आणखी 14 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीची तीव्रता पाहता आजूबाजूच्या इमारतीही रिकामी करण्यात आल्या आहेत. आग एवढी भीषण आहे की, त्यावर अद्याप नियंत्रण मिळवता आलेले नाही. स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पोलीस कर्मचाऱ्यांनी इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या आणि आत अडकलेल्या लोकांना आणि जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.
#UPDATE | 26 bodies recovered in the fire at 3-storey commercial building which broke out this evening near Delhi’s Mundka metro station: Sunil Choudhary, Deputy Chief Fire Officer, Delhi Fire Service pic.twitter.com/OpLo4J8uN8
— ANI (@ANI) May 13, 2022