

बंगळूर ; पुढारी वृत्तसेवा : अखेरच्या क्षणापर्यंत तीव्र कुतूहल निर्माण केलेल्या बोम्मई मंत्रिमंडळ मध्ये 29 जणांचा समावेश करण्यात आला. बुधवारी दुपारी 2.15 वाजता झाला. बेळगाव जिल्ह्यातून निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले आणि हुक्केरीचे आमदार उमेश कत्ती यांना पुन्हा मंत्रिपद मिळाले.
उपमुख्यमंत्रिपद रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णयही घेण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुराप्पा यांच्या विरोधकांना डावलण्यात आले आहे. खातेवाटप दोन दिवसांत होईल.
माजी मंत्री श्रीमंत पाटील, रमेश जारकीहोळी, लक्ष्मण सवदी यांना मंत्रिपद मिळाले नाही. मंत्रिमंडळात अजून 5 जागा रिक्त असून, दुसर्या विस्तारात या नेत्यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे.
बीदरमधील औरादमधून प्रभू चव्हाण, कारवारमधील यल्लापुरातून शिवराम हेब्बार यांनाही पुन्हा संधी देण्यात आली. येडिंविरुद्ध बंडखोर भूमिका घेणारे बसनगौडा पाटील यत्नाळ, अरविंद बेल्लद, सी. पी. योगेश्वर, एच. विश्वनाथ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकले नाही. मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतरही येडियुराप्पा यांनी राज्य सरकारमधील आपले वर्चस्व कायम राखले आहे.
राजभवनातील ग्लास हाऊसमध्ये झालेल्या साध्या समारंभात राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देवविली.
येडियुराप्पा मुख्यमंत्रिपदी असताना त्यांच्या मंत्रिमंडळात असणार्या सातजणांना बोम्मई मंत्रिमंडळ मध्ये संधी नाकारण्यात आली. येडियुराप्पांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र, येडिंचे निकटवर्तीय रेणुकाचार्य यांनी मंत्रिपदासाठी खूप प्रयत्न केले होते; पण त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले.
बेळगाव जिल्ह्यातील कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांना या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. जगदीश शेट्टर, लक्ष्मण सवदी, सुरेशकुमार, अरविंद लिंबावळी, सी. पी. योगेश्वर, आर. शंकर यांना यावेळी संधी हुकली. लैंगिक छळ केल्याचा आरोप असणारे रमेश जारकीहोळी यांनाही संधी नाकारण्यात आली.
यंदा पहिल्यांदाच जारकीहोळी कुटुंबातील एकाही आमदाराला मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. रमेश यांच्याऐवजी भालचंद्र यांना मंत्रिपद मिळणार असल्याचे सांगण्यात येत होते. पण, अखेरच्या क्षणी त्यांच्या नावाचाही विचार होऊ शकला नाही.
नव्या मंत्रिमंडळात 8 लिंगायत, 7 वक्कलिग, मागासवर्ग 7, अनुसूचित जाती 3, अनुसूचित जमाती 1, ब्राह्मण 1, रेड्डी 1, महिला कोटा 1 अशी नियुक्ती करण्यात आली आहे. सामाजिक न्याय, जुने-नवे नेते यांचा समावेश करून समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
मंत्रिमंडळ विस्तारावेळी बहुतेक मंत्र्यांनी ईश्वराच्या नावे शपथ घेतली. काहींनी आपल्या इष्ट देवतांच्या नावे, शेतकरी आणि मतदारसंघातील मतदारांच्या नावे शपथ घेतली. आनंद सिंग यांनी विजयनगराचे आराध्यदैवत हंपी वीरुपाक्षप आणि भुवनेश्वरी देवीच्या नावे शपथ घेतली.
लमाणी समाजाचे प्रतिनिधीत्व करणारे प्रभू चव्हाण यांनी पारंपरिक पोशाखात येऊन लक्ष वेधले. संत सेवालाल आणि गोमातेच्या नावे त्यांनी शपथ घेतली.
मुरुगेश निराणींनी ईश्वर आणि शेतकर्यांच्या नवे, शिवराम हेब्बार यांनी ईश्वर आणि मतदारसंघातील मतदार, बी. सी. पाटील यांनी शेतकरी आणि जगज्योती बसवेश्वर यांच्या नावे, शशिकला जोल्ले यांनी ईश्वर आणि मतदार, शंकर पाटील मुनेन्नकोप यांनी ईश्वर व मतदारांच्या नावे शपथ घेतली.
कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील, गोकाकचे रमेश जारकीहोळी, आणि अथणीचे लक्ष्मण सवदी यांना नव्या मंत्रिमंडळात संधी मिळालेली नाही. त्यांचे पुनर्वसन कसे करणार, याचे उत्तर भाजपकडून आलेले नाही. त्यांना महत्त्वाचे पद मिळाले नाही, तर आगामी काळात पक्ष संघटनेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.