मिझोरामला दगडखाण कोसळून 17 जणांचा मृत्यू

मिझोरामला दगडखाण कोसळून 17 जणांचा मृत्यू

आयझॉल, वृत्तसंस्था : पश्चिम बंगालमध्ये सोमवारी आलेल्या 'रेमल' चक्रीवादळाचा प्रकोप दुसर्‍या दिवशी ईशान्येकडील राज्यांवर झाला. वादळ आणि संततधार पावसामुळे मिझोरामच्या आयझॉलमधील दगडखाण मंगळवारी सकाळी 6 वाजता कोसळली. त्यात 17 जणांचा मृत्यू झालेला असून, मृतांत एक 6 वर्षांची मुलगी व 4 वर्षांचा मुलगाही आहे. दोनजणांना ढिगार्‍याखालून सुखरूप काढण्यात आले आहे. 16 जण अद्याप बेपत्ता आहेत. हे सगळे ढिगार्‍याखाली दबलेले असून, त्यांचा शोध सुरू आहे. मृतांचा आकडा वाढेल, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.

आतापर्यंत 10 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सात स्थानिकांचे, तर तीन इतर राज्यातील रहिवाशांचे आहेत. हे सगळे कामगार आहेत, असे मिझोरामचे पोलिस महासंचालक अनिल शुक्ला यांनी सांगितले. बचाव कार्य सुरू आहे; मात्र पावसामुळे अडचणी येत आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

घर वाहून गेले; 3 बेपत्ता

मिझोराममध्ये इतर अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या. त्यात दोनजणांचा मृत्यू झाला. सालेम वेंग (आयझॉल) येथे भूस्खलनानंतर एक घर पाण्यात वाहून गेल्याने तीनजण बेपत्ता आहेत.

शाळा, कार्यालये बंद

मिझोराममधील सर्व शाळा आणि सरकारी कार्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. खासगी कंपन्यांनी त्यांच्या कर्मचार्‍यांना 'वर्क फ्रॉम होम' सांगितले आहे.

देशाशी संपर्क तुटला

हुंथरमधील राष्ट्रीय महामार्ग-6 वर भूस्खलनामुळे आयझॉलचा देशाच्या इतर भागापासून संपर्क तुटला आहे. राज्यातील अनेक राज्य महामार्गही बंद आहेत.
मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी तातडीची बैठक बोलावली होती. गृहमंत्री के. सपडांगा, मुख्य सचिव रेणू शर्मा आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आसाममध्ये 16 जखमी

आसाममध्येही मंगळवारी मुसळधार तसेच वादळी पाऊस झाला. मोरीगावला झाड उन्मळून ऑटो रिक्षावर पडल्याने एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर चारजण जखमी झाले. सोनितपूरमध्येही झाड उन्मळून ते धावत्या स्कूल बसवर पडल्याने 12 मुले जखमी झाली.

लष्करही अलर्टवर

एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि लष्करही अलर्टवर असून, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राज्यातील जनतेला घरातच राहण्याचे आवाहन केले आहे.

बिहारला 5 दिवस 'रेमल'चा धोका

'रेमल'चा धोका बिहारला 5 दिवस कायम राहू शकतो, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. बिहारमध्ये ठिकठिकाणी रेड, ऑरेंज अलर्ट जारी आहे. बिहार-बंगालदरम्यानच्या विमानसेवांना त्याचा फटका बसलेलाच आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news