गुंटूर ; वृत्तसंस्था : आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. 13 वर्षीय मुलीची विक्री करून तिला जबरदस्तीने वेश्या व्यवसायासाठी भाग पाडण्यात आल्याचे समोर आले आहे. एकूण 8 महिन्यांच्या काळात 80 जणांसोबत तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याचेही तपासात उघड झाले आहे.
या अल्पवयीन मुलीला तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील अनेक भागांत वेश्याव्यवसायासाठी भाग पाडले गेले. पोलिसांनी मंगळवारी या मुलीची सुटका केली. सर्व 80 आरोपींची ओळख पटली असून त्यापैकी 10 जणांना अटक करण्यात आली आहे. तर उर्वरीत आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणात पहिली अटक जानेवारी महिन्यात झाली होती.
80 आरोपींपैकी 35 जण दलाल आहेत तर उर्वरीत ग्राहक आहेत. यात काही विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. मुलीच्या असाह्यतेचा आणि परिस्थितीचा फायदा घेऊन अनेकांनी तिचा सौदा केला होता. तिला ठिकठिकाणी विकले होते. एक आरोपी लंडनमध्ये असल्याचेही समजते. पोलिसांनी विजयवाडा, हैदराबाद, काकीनाडा, नेल्लोर येथून पकडलेल्या आरोपींकडून एक कार, 53 मोबाईल फोन, तीन रिक्षा, काही बाईक्स जप्त केल्या आहेत.
आईच्या मैत्रिणीकडून मुलीची फसवणूक
या मुलीच्या आईचे कोरोनाने निधन झाले होते. त्यापूर्वी जून 2021 मध्ये एका रुग्णालयात मुलीच्या आईची एक नवी मैत्रीण झाली होती. स्वर्णाकुमारी असे तिचे नाव होते. स्वर्णा हिने या मुलीला स्वतःसोबत ठेवले. मुलीच्या वडिलांना काहीही कल्पना न देता स्वर्णाकुमारी या मुलीला सोबत घेऊन गेली.
वडिलांच्या तक्रारीनंतर प्रकार उघडकीस
ऑगस्ट 2021 मध्ये मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. तेव्हा पोलिसांचे हात स्वर्णाकुमारीपर्यंत पोहोचले. पोलिसांनी आरोपी आणि पीडित मुलीची चौकशी केल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली.