संगीतकार इलैया राजा यांच्या पुस्तकावरून वाद, पंतप्रधान मोदींची डॉ. आंबेडकर यांच्याशी तुलना | पुढारी

संगीतकार इलैया राजा यांच्या पुस्तकावरून वाद, पंतप्रधान मोदींची डॉ. आंबेडकर यांच्याशी तुलना

चेन्नई/नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : संगीतकार इलैया राजा यांच्या ‘आंबेडकर अँड मोदी : रिफॉर्म्स आयडियाज, परफॉर्मन्स इंप्लीमेंटेशन’ या पुस्तकावरून वाद निर्माण झाला आहे. पुस्तकात इलैया राजा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी केली आहे. त्यावरून तमिळनाडूतील सत्ताधारी द्रमुक आणि काँग्रेस पक्षाने पुस्तकाला विरोध केला आहे.

आंबेडकर जयंतीदिनी 14 एप्रिल रोजी या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते. या पुस्तकात डॉ. आंबेडकर आणि पंतप्रधान मोदी यांच्या व्यक्तिमत्त्वातील साम्य दाखवले आहे. दोघांनी गरिबी आणि सामाजिक परिस्थिती जवळून पाहिली आणि ती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. दोघांनीही समाजातील मागासांच्या अडचणींविरोधात लढा दिला. विचार आणि कृतीवर दोघांचाही विश्वास होता, असे म्हटले आहे.

काँग्रेस खासदार कीर्ती चिदंबरम यांनी यावर टीका करताना ट्विटमध्ये म्हटले आहे की, मोदींची तुलना त्या विद्वानासोबत केली गेली आहे ज्याने आपले संविधान बनविण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. ही तुलना अत्यंत चुकीची आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मात्र इलैया राजा यांचे समर्थन केले आहे. नड्डा म्हणाले की, तमिळनाडूतील सत्ताधारी पक्ष देशातील एका महान संगीत उस्तादाचा अपमान करत आहेत. कारण त्यांचे विचार एका राजकीय पक्षाला पटत नाहीत. हीच लोकशाही आहे का? संगीतकार ए. आर. रेहमान यांनी गृहमंत्री अमित शहांच्या देशात हिंदी भाषा बोलली जावी, या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली होती. प्रत्येकाचे आपापले विचार असतात. त्यावरून त्यांचा अपमान करायचा? त्यांना सोशल मीडियात ट्रोलिंग करणे चुकीचे आहे.

वक्तव्य मागे घेण्यास इलैया राजा यांचा नकार

संगीतकार इलैया राजा यांचा धाकटा भाऊ गंगाई अमरान यांनी सांगितले की, प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. इलैया राजा पुस्तकातील मांडणी मागे घेणार नाहीत. दरम्यान, अमरान हे 2017 पासून भाजपमध्ये आहेत.

Back to top button