प्रशांत किशोर, ‘काँग्रेसने ३७० जागांवर लक्ष केंद्रित करावे’ | पुढारी

प्रशांत किशोर, ‘काँग्रेसने ३७० जागांवर लक्ष केंद्रित करावे’

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी 10 जनपथ या सरकारी निवासस्थानी पक्षाच्या नेत्यांची चार तास तातडीची बैठक घेतली. यावेळी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर हे सुद्धा उपस्थित होते. देशात काँगे्रसची बळकटीकरण करण्यासाठी प्रशांत किशोर यांनी एक प्रेझेंटेशन केले. 2024 लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन प्रशांत किशोर यांनी रोडमॅप तयार केला असून काँग्रेसने 543 जागांपैकी 370 जागांवर लक्ष्य केंद्रित करून अन्य जागा मित्र पक्षांना सोडण्याची विनंती प्रशांत किशोर यांनी प्रेझेंटेशनमध्ये केली आहे.

देशातील काँग्रेसच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी एका समितीची घोषणा सोनिया गांधी यांनी केली. ही समिती आठवड्याभरात आपला अहवाल देणार असल्याची माहिती काँग्रसचे संघटनात्मक सरचिटणीस के. सी. वेणुगोपाळ यांनी दिली.

राज्यसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी बैठक कशासाठी बोलावली आहे हे आम्हाला माहिती नाही, असे सांगितले; मात्र बैठकीला उपस्थित असलेले प्रशांत किशोर यांना पाहून खर्गे यांना आश्‍चर्याचा धक्‍का बसला.

बैठकीला राहुल गांधी, जयराम रमेश, ए. के. अ‍ॅन्थोनी, दिग्विजय सिंग, अजय माकन, अंबिका सोनी, मुकुल वासनिक, पी. चिदंबरम आणि रणदीप सूरजेवाला उपस्थित होते.

काँग्रेसच्या उच्चस्तरीय बैठकीला प्रथम प्रशांत किशोर यांनी हजेरी लावली. गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर रणनीती ठरवली गेली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. गुजरातमध्ये पक्षाबरोबर काम करण्यास उत्सुक असल्याचे प्रशांत किशोर यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते; मात्र त्यांना काँग्रेस पक्षात सहभागी करून घ्यावयाचे की नाही याबाबत निर्णय झालेला नाही. भविष्यात काय करायचे याबाबतचा निर्णय 2 मे पर्यंत घेणार असल्याचे प्रशांत किशोर यांनी सांगितले.सोनिया गांधी यांची पंतप्रधान मोदींवर टीका

रामनवमीनिमित्त देशातील विविध भागांत झालेल्या हिंसाचाराबद्दल यावेळी सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडक शब्दात टीका केली. भाजपकडून देशात कट्टरता, द्वेष पसरविण्याचे काम सुरू आहे. भारतीय समाज आणि राष्ट्र कमजोर करण्याचे काम केले जात असल्याचे टीकास्त्र यावेळी सोनिया गांधी यांनी भाजपवर सोडले.

Back to top button