Skymet : आनंदवार्ता! यंदाचा मान्सून शेतीसाठी कसा असेल? | पुढारी

Skymet : आनंदवार्ता! यंदाचा मान्सून शेतीसाठी कसा असेल?

पुढारी ऑनलाईन डेस्क : चटके देणाऱ्या उन्हामुळे सर्वजण हैराण झाले असताना हवामान अंदाज वर्तवणाऱ्या खासगी संस्था स्कायमेटने (Skymet Monsoon ) एक चांगली बातमी दिली आहे. यंदाचा मान्सून सरासरीइतका म्हणजेच सर्वसाधारण असेल. जूनच्या सुरुवातीला मान्सूनची सुरुवात चांगली होईल. तर देशभरात सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. यंदाच्या मोसमी पावसाचे हे दुसरे पुर्वानुमान आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

(Skymet Monsoon ) जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी ८८०.६ मिमी पाऊस पडतो. दीर्घकालीन सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस हा सरासरीइतका म्हणजेच सर्वसाधारण मानला जातो. त्या तुलनेत यंदा पावसाची ९८ टक्के शक्यता आहे. गुजरातमध्ये सामान्यपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. तर, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा आणि महाराष्ट्रात जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन वर्षी मोसमी पावसावर ला निनाचा प्रभाव होता. तत्पूर्वी ला निनाचा प्रभाव हिवाळ्याच्या ऋतूत वेगाने घटला. मात्र, पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांची गती अधिक असल्याने ला निनाचा प्रभाव कमी होण्याची प्रक्रिया थांबली आहे. नैऋत्य मोसमी पावसाच्या सुरुवातीपर्यंत ला निनाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अल निनोची शक्यता नाही, असे स्कायमेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, राजस्थान, गुजरात आणि ईशान्येकडील नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा येथे यंदा पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. याशिवाय केरळ आणि उत्तर कर्नाटकच्या अंतर्गत भागात जुलै आणि ऑगस्ट या महिन्यांमध्ये पाऊस कमी होईल. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश, उत्तर भारतातील कृषी क्षेत्रांत आणि महाराष्ट्र, मध्य प्रदेशच्या पर्जन्यक्षेत्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल. मोसमातील पहिले दोन महिने शेवटच्या दोन महिन्यांपेक्षा अधिक चांगले असतील. यंदाचा मान्सून शेतीसाठी चांगला असेल. कारण, सुरुवातीच्या महिन्यात पिकांच्या पेरणीसाठी चांगला पाऊस होईल. यामुळे शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button