कोरोना अपडेट : देशातील ४६ जिल्ह्यात अत्यंत कडक निर्बंध करण्याचे आदेश - पुढारी

कोरोना अपडेट : देशातील ४६ जिल्ह्यात अत्यंत कडक निर्बंध करण्याचे आदेश

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : कोरोना अपडेट : देशातील ज्या जिल्ह्यांमध्ये दहा टक्क्यांपेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्हीटी दर आहे, अशा ठिकाणचे निर्बंध कडक करावेत, असे निर्देश केंद्र सरकारने शनिवारी राज्यांना दिले. कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असलेल्या दहा राज्यांच्या प्रतिनिधींशी आरोग्य खात्याचे सचिव राजेश भूषण यांनी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.
कोरोना अपडेट : देशातील 46 जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हीटी दर 10 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. 5 ते 10 टक्क्यांच्या दरम्यान पॉझिटिव्हीटी दर असलेल्या जिल्ह्यांची संख्या 53 इतकी आहे. हा दर कमी करण्यासाठी राज्यांनी गंभीरपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे.
उच्च पॉझिटिव्हीटी दर असलेल्या राज्यांबरोबरच ज्या राज्यांत कोरोना वेगाने वाढत आहे, अशा राज्यांना आरोग्य खात्याने पाचारण केले होते. या राज्यात केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, ओडिशा, आसाम, मिझोराम, घालय, आंध्र प्रदेश आणि मणिपूर यांचा समावेश आहे.
सध्याच्या स्थितीत कोणताही दुर्लक्षपणा करणे म्हणजे संकटाला आमंत्रण देण्यासारखे असल्याचे राजेश भूषण यांनी राज्यांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल सायन्सेस अर्थात आयएमसीआर महासंचालक बलराम भार्गव हेही बैठकीस उपस्थित होते. सध्या दिवसाला रूग्ण संख्येत 40 हजारने भर पडत आहे. हा आकडा काही साधा नाही.

Back to top button