sharad pawar : शरद पवारांच्या स्नेहभोजन कार्यक्रमास सर्वपक्षीय आमदार खासदारांची उपस्थिती | पुढारी

sharad pawar : शरद पवारांच्या स्नेहभोजन कार्यक्रमास सर्वपक्षीय आमदार खासदारांची उपस्थिती

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : देशातील राजकारणातील तीन दिग्गज नेते मंगळवारी संध्याकाळी एकाच ठिकाणी एकत्रित आले. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्या निवासस्थानी आयोजित स्नेहभोजन कार्यक्रमाला हजेरी लावली. दोन दिवसीय संसदीय कार्यप्रणाली संदर्भात आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेसाठी राज्यातील आमदार राजधानीत आहेत.

यानिमित्त पवारांकडून सर्वपक्षीय आमदारांसाठी स्नेहभोज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देखील या कार्यक्रमाकरिता पवारांकडून आमंत्रित करण्यात आले होते. विशेष म्हणजे मुंबईतील मालमत्तेवर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाई नंतर संजय राऊत पहिल्यांदाच शरद पवार (sharad pawar) यांच्या घरी पोहोचले होते.

या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील, शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते. यासोबतच आमदार अभिमन्यू पवार, नमिता मुंदडा, निरंजन डावखरे, संग्राम थोपटे उपस्थित होते.

Back to top button