भाजप मालामाल..! उद्योग जगतातून सर्वाधिक देणग्या | पुढारी

भाजप मालामाल..! उद्योग जगतातून सर्वाधिक देणग्या

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये कॉर्पोरेट कंपन्यांकडून राष्ट्रीय राजकीय पक्षांना 921.95 कोटी रुपयांची देणगी प्राप्त झाली आहे. यापैकी सर्वाधिक (एकूण देणगीच्या 78 टक्के) देणगी भाजपला मिळाली आहे. ‘असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्स’च्या (एडीआर) अहवालानुसार या 921.95 कोटींपैकी एकट्या भाजपला 720.407 कोटी रुपयांची देणगी देशातील उद्योग जगतातून मिळाली आहे.

अहवालात देशातील पाच राजकीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांचा लेखाजोखा दिलेला आहे. ‘एडीआर’ ही राजकारणातील पारदर्शकतेसाठी कार्यरत असलेली एक खासगी संस्था असून, या संस्थेच्या माहितीनुसार 2017-18 आणि 2018-19 दरम्यान राष्ट्रीय राजकीय पक्षांना मिळणार्‍या कोर्पोरेट देणग्यांमध्ये आता मोठी वाढ झाली आहे. ही वाढ तब्बल 109 टक्क्यांची असल्याचा दावा ‘एडीआर’ने केला आहे. विविध पक्षांनी निवडणूक आयोगासमोर सादर केलेल्या देणग्यांबद्दलच्या माहितीवरून हा अहवाल तयार केला आहे.

भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया-मार्क्सवादी (सीपीएम) या राजकीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांचे विश्लेषण ‘एडीआर’ने केले आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात भाजपला 2 हजार 25 देणगीदारांकडून रकमा मिळाल्या. काँग्रेस पक्षाला 154 देणगीदारांकडून 133.04 कोटी रुपये मिळाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 36 कॉर्पोरेट देणगीदारांकडून 57.086 कोटी रुपयांची देणगी मिळाली. ‘सीपीएम’ने 2019-20 साठी कॉर्पोरेट देणग्यांमधून कोणतेही उत्पन्न मिळाले नसल्याचे म्हटले आहे़. तृणमूल काँग्रेसला मिळालेल्या देणग्यांचा कुठलाही तपशील उपलब्ध झालेला नाही.

देणगीदारांत ‘भारती’सह या कंपन्या आघाडीवर

भारती ग्रुप (भारती एंटरप्रायझेस), आयटीसीसारखी नावे देणगीदारांत आघाडीवर आहेत. भारती एंटरप्रायझेसचे प्रूडंट इलेक्टोरल ट्रस्ट देणग्यांमध्ये आघाडीवर आहे. 2019-20 मध्ये राजकीय पक्षांना 247.75 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. ट्रस्टने भाजपला 216.75 कोटी रुपये आणि काँग्रेसला 31 कोटी रुपये दिले आहेत. आयटीसी लिमिटेड, जनकल्याण इलेक्टोरल ट्रस्ट, बीजी शिर्के कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड आणि पंचशील कॉर्पोरेट पार्क प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्या 2019-20 मध्ये देणगीच्या बाबतीत आघाडीवर आहेत.

Back to top button