देशातील बेरोजगारीच्या दरात घट | पुढारी

देशातील बेरोजगारीच्या दरात घट

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : देशातील कोरोना महामारीचे संकट जवळजवळ ओसरले असताना भारतीय अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्याचे संकेत मिळत आहेत. रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत असल्याचे आशादायी चित्र आहे. फेब्रुवारीमध्ये देशातील बेरोजगारीचा दर 8.10 टक्के होता. त्यामध्ये घट होऊन मार्च महिन्यात हा दर 7.6 टक्के झाला आहे.

बेरोजगारीचा दर कमी होत असल्याने भारतीय अर्थव्यवस्था उभारी घेण्याच्या मार्गावर असल्याचा अहवाल सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) या संस्थेने दिला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बेरोजगारीचा दर प्रत्येकी 4.35 टक्के नोंदवण्यात आला.

सीएमआयईच्या अहवालानुसार, 2022-23 या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला बेरोजगारीच्या दरात घट नोंदवण्यात आली आहे. देशात 2 एप्रिलला शहरी बेरोजगारी 8.5 टक्के आणि ग्रामीण बेरोजगारीचा दर 7.5 टक्के नोंदवण्यात आला. कोरोना महामारीच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात घट झाली. त्याचा सर्वाधिक परिणाम बेरोजगारीवर झाला होता. एप्रिल-जून 2021 दरम्यान शहरी बेरोजगारी विक्रमी 12.6 टक्क्यापर्यंत पोहोचली होती.

भारतीय सांख्यिकीय संस्थेचे सेवानिवृत्त प्रा. अभिरूप सरकार यांच्या म्हणण्यानुसार, देशातील बेरोजगारीचे प्रमाण घटत आहे. मात्र भारतासारख्या गरीब आणि खंडप्राय देशात सध्या बेरोजगारीचा दर उच्चस्तरावर आहे. तो कमी होण्यासाठी काही काळ लागेल. हरियाणात सर्वाधिक बेरोजगारी देशात मार्च महिन्यात सर्वाधिक विक्रमी 26.7 टक्के बेरोजगारी हरियाणात नोंदवण्यात आली.

Back to top button