नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाचे संकट टळल्याने औद्योगिक आणि सेवा क्षेत्राकडून विजेच्या मागणीत सुधारणा झालेली आहे, त्यातच आता उन्हाळा सुरु झाल्याने ही मागणी मोठ्या प्रमाणात वाढेल, असा अंदाज ऊर्जा मंत्रालयातील सूत्रांनी व्यक्त केला आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवशी विजेच्या मागणीत बारा टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली होती. या दिवशी विजेची मागणी तब्बल १९८.४७ गीगावॉटवर गेली होती. (Electricity)
एप्रिल २०२१ मध्ये विजेची दैनिक सरासरी मागणी १८२.३७ गीगावॉट इतकी होती. तत्पूर्वीच्या वर्षात ही मागणी १३२.७३ गीगावॉट इतकी होती. कोरोना संकटामुळे वर्ष २०२० साली देशव्यापी लॉकडाउन लागू करण्यात आला होता. त्यामुळे विजेची मागणी प्रचंड प्रमाणात घटली होती. कोरोनाचे संकट आता टळले आहे.
शिवाय औद्योगिक, सेवा क्षेत्रासह बहुतांश क्षेत्रे पूर्वपदावर आलेली असल्याने वीज मागणी पूर्ववत झाली आहे. त्यातच आता उन्हाळा सुरु झाल्याने विजेच्या मागणीत जबरदस्त वाढ होण्याचा अंदाज असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. उन्हाळ्यात पंखे, कुलर्स तसेच एसीचा वापर वाढतो. यासाठी लोकांना विजेची गरज भासते. (Electricity)