Petrol Diesel Prices : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका कायम, १२ दिवसांत ७.२० रुपयांची वाढ | पुढारी

Petrol Diesel Prices : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका कायम, १२ दिवसांत ७.२० रुपयांची वाढ

पुढारी ऑनलाईन डेस्क : तेल कंपन्यांनी इंधन दरात प्रतिलिटर 80-80 पैशांची वाढ केली आहे. गेल्या 12 दिवसांतील ही 10वी वाढ असून या वाढीनंतर तेलाच्या दरात आतापर्यंत 7.20 रुपयांची वाढ झाली आहे. (Petrol Diesel Prices)

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आज, शनिवार, 2 एप्रिल 2022 रोजी पुन्हा वाढल्या आहेत. आजही तेल कंपन्यांकडून (OMCs) पेट्रोल- डिझेलच्या किमती प्रति लिटर 80-80 पैशांनी वाढवण्यात आल्या आहेत. गेल्या 12 दिवसांतील ही 10वी वाढ असून या वाढीनंतर तेलाच्या दरात आतापर्यंत 7.20 रुपयांनी वाढ झाली आहे. म्हणजेच एक लिटर पेट्रोल किंवा डिझेलवर 7.20 रुपये अधिक मोजावे लागत आहेत. शुक्रवारी इंधन दरात कोणताही बदल झालेला नव्हता.

ब्रेंटची दोन वर्षांतील सर्वात मोठी साप्ताहिक घसरण

शुक्रवारी जागतिक बाजारपेठेतील ब्रेंट क्रूड ऑईलच्या किमतींमध्ये पहिल्याच आठवड्यात गेल्या दोन वर्षांतील मोठी घसरण पहायला मिळाली. जागतिक ऑईल बेंचमार्क $102.37 वर स्थिरावल्यानंतर, ते 0.3 टक्क्यांनी घसरून 104.39 डाॅलर प्रति बॅरलवर स्थिर झाले. गेल्या एका आठवड्यात ब्रेंट क्रूड ऑईलमध्ये 13% ची घसरण झाली आहे, जी एप्रिल 2020 नंतरची सर्वात मोठी घसरण आहे.

रशिया-युक्रेन युद्धामुळे तेलाच्या किमतीने उच्चांक गाठला आहे. पुढील काही दिवसांत भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 9 ते 12 रुपयांनी वाढू शकतात, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.

मेट्रो शहरांमधील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

या दरवाढीनंतर आज पेट्रोलने दिल्लीत 102 रुपये तर मुंबईत 117 रुपयांचा पल्ला गाठला. दिल्लीत पेट्रोलचा दर 102.61 रुपये आणि डिझेलचा दर 93.87 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत एक लिटर तेल 117.57 रुपये, तर डिझेल 101.79 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 112.19 तर डिझेल 97.02 रुपये प्रति लिटर, चेन्नईत पेट्रोल 108.21 तर डिझेल 98.28 रुपये प्रति लिटर इतकी दरवाढ झालेली आहे.

हेही वाचा

Back to top button