हायड्रोजनवर चालणाऱ्या कारसाठी ३ हजार कोटींचे मिशन : नितीन गडकरी | पुढारी

हायड्रोजनवर चालणाऱ्या कारसाठी ३ हजार कोटींचे मिशन : नितीन गडकरी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी बुधवारी हायड्रोजनवर चालणाऱ्या टोयोटा मिराई कारमधून संसदेत आले. गडकरी पर्यायी इंधनाचा पुरस्कार करत आहेत. तसेच आता त्यांनी इंधनाचे भविष्य हायड्रोजन असल्याचे दाखवून दिले आहे.

गडकरी म्हणाले, आत्मनिर्भर होण्यासाठी आम्ही पाण्यापासून तयार होणारा ग्रीन हायड्रोजनवर चालणा-या वाहनाच्या निर्मितीला प्रोत्साहन दिले आहे. ही कार एक पायलट प्रोजेक्टचा भाग आहे. यापुढे देशात ग्रीन हायड्रोजनचे उत्पादन सुरू करण्यास प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे आयातीला आळा बसेल आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, असे त्यांनी सांगितले. भारत सरकारने ३००० कोटी रुपयांचे मिशन सुरू केले आहे आणि लवकरच हायड्रोजन निर्यात करणारा देश बनेल. ज्‍या देशात कोळसा वापरला जाईल तिथे ग्रीन हायड्रोजनचा पर्याय उपलब्ध केला जाईल.

गडकरी म्‍हणाले, यापुढे दिल्लीच्या रस्त्यावर हायड्रोजनवर चालणाऱ्या कार दिसणार आहेत. लोकांना हायड्रोजन इंधन वापरण्यास प्रोत्साहित केले जाईल. जे भविष्यातील इंधन असेल. ही कार जपानच्या टोयोटा कंपनीची असून फरिदाबाद येथील इंडियन ऑईल पंपातून हायड्रोजन इंधन भरले जाणार असल्याचे गडकरी म्‍हणाले.

दोन वर्षात पेट्रोल वाहनाची आणि याची किंमत सारखी

गडकरींनी संसदेत पर्यायी इंधनाविषयी सांगितले की, हरित इंधनामुळे इलेक्ट्रिक ऑटोमोबाईलची किंमत कमी होईल आणि पुढील दोन वर्षांत ते पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांच्या बरोबरीने येतील. पर्यायी इंधनामुळे राष्ट्रीय राजधानीतील प्रदूषण पातळीही कमी होईल. जास्तीत जास्त दोन वर्षात इलेक्ट्रिक स्कूटर, कार, ऑटोरिक्षा यांच्या किंमती पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांप्रमाणेच असतील. लिथियम आयन बॅटरीच्या किंमती कमी होत आहेत. लिथियम-आयन बॅटरीच्या किमती कमी होत आहेत. झिंक-आयन, अॅल्युमिनियम-आयन, सोडियम-आयन बॅटरीचे रसायन आम्ही विकसित करत आहोत. जर पेट्रोलवर १०० रुपये खर्च करत असाल, तर तुमचा इलेक्ट्रिक वाहनावर १० रुपये खर्च होईल.

कारची वैशिष्‍टये :

या कारमध्ये अवघ्या पाच मिनिटांत इंधन भरता येते, असा कंपनीचा दावा आहे. एकदा पूर्ण टाकी भरल्यानंतर ही कार 646 किमीपर्यंतचे अंतर कापू शकेल. टोयोटा किर्लोस्कर मोटर आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजीने टोयोटा मिराई भारतीय रस्ते आणि हवामान परिस्थितीसाठी किती योग्य आहे याचा अभ्यास करण्यासाठी एक पथदर्शी प्रकल्प सुरू आहे.

ग्रीन हायड्रोजवर कशी चालते कार ?

ग्रीन हायड्रोजन हा पारंपरिक इंधनाचा पर्याय आहे. जो कोणत्याही वाहनावर वापरता येतो. मध्यम ते लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ग्रीन हायड्रोजन इंधन अत्यंत विश्वासार्ह मानले जाते. ग्रीन हायड्रोजन हे शून्य उत्सर्जन करणारे इंधन आहे. म्हणजेच त्यातून कोणतेही प्रदूषण होत नाही. तसेच इतर कोणतेही उत्सर्जन होणार नाही. आणि या कारमध्ये हायड्रोजन भरण्यासाठी 3 ते 5 मिनिटे लागतील जसे की पेट्रोल भरण्यासाठी लागतात.

Back to top button