पेट्रोल आणि डिझेल यावरील 26 लाख कोटींच्या अबकारी कराचा हिशेब द्या | पुढारी

पेट्रोल आणि डिझेल यावरील 26 लाख कोटींच्या अबकारी कराचा हिशेब द्या

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : गेल्या सहा दिवसांत पाचवेळा पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ झाल्यानंतर रविवारी काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. गेल्या आठ वर्षांत पेट्रोल आणि डिझेलच्या माध्यमातून जमा झालेल्या 26 लाख कोटी रुपयांच्या अबकारी कराचा हिशेब देण्याची मागणी काँग्रेसने केली. काँग्रेस प्रवक्‍ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, केंद्राने आता हिशेब देण्याची वेळ आली आहे.

गेल्या आठ वर्षांत केंद्राने पेट्रोल आणि डिझेल विक्रीतून मिळालेल्या अबकारी कराच्या माध्यमातून 26 लाख कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमुळे 137 दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले होते. मात्र केवळ सहा दिवसांत ग्राहकांची लूट केली जात असल्याचे सुरजेवाला यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

दरम्यान, रविवारी पेट्रोलच्या दरात 50 तर डिझेलच्या दरात 55 पैशांनी वाढ झाली. त्यामुळे सहा दिवसांत पेट्रोलचे दर 3.70 आणि डिझेल दर 3.75 पैशांनी वाढले आहेत.

पेट्रोल दरात 50 तर डिझेल दरात 55 पैशांची वाढ

सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून इंधन दरवाढीचा सपाटा सुरू झाला असून तेल कंपन्यांनी रविवारी पेट्रोल दरात 50 पैशांची तर डिझेल दरात 55 पैशांची वाढ केली. गेल्या सहा दिवसांत पेट्रोल दरात एकूण 3.70 रुपयांची तर डिझेल दरात 3.75 रुपयांची वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल प्रती लिटर भाव 99.11 रुपयांवर तर, डिझेलचे भाव 89.87 रुपयांवर आहेत.

Back to top button