द काश्मीर फाईल्स : “काश्मिरी पंडितांपेक्षा मुस्लिमांवरही झालेत ५० पटीने अधिक अत्याचार” | पुढारी

द काश्मीर फाईल्स : "काश्मिरी पंडितांपेक्षा मुस्लिमांवरही झालेत ५० पटीने अधिक अत्याचार"

पुढारी ऑनलाईन डेस्क : द काश्मीर फाईल्स हा सिनेमा काल्पनिक आहे, असे सांगत जम्मू-काश्मीर पीपुल्स काॅन्फ्रेन्सचे अध्यक्ष सज्जाद लोन म्हणाले की, “या सिनेमाचे निर्माते देशात द्वेष निर्माण करत आहे. काश्मिरी मुस्लिमांवर काश्मिरी पंडितापेक्षा ५० पटीने अत्याचार झालेले आहेत”, असे वक्तव्य सज्जाद लोन यांनी केले आहे.

“काश्मिरी पंडितांवर अत्याचार झाला, यात कोणतीच शंका नाही. पण, काश्मिरी पंडितांच्या अत्याचाराच्या तुलनेत काश्मिरी मुस्लिमांवर ५० पटीने अत्याचार झाले आहेत. तुम्ही फक्त एकाच समुदायाचे दस्ताऐवजीकरण करू शकत नाही. आपण सर्व पीडितच आहोत. मी स्वतः माझ्या वडिलांना गोळीबारात गमावले आहे. १९९० च्या दशकात काश्मिरी मुसलमान काश्मिरी पंडितांसारखेच लाचार होते”, असंही सज्जाद लोन म्हणाले.

“हा सिनेमा काल्पनिक आहे. मी पंतप्रधानांना विनंती करतो की, सिनेमाचे निर्माते विवेक अग्निहोत्री यांना राज्यसभेची जागा द्यावी. नाहीतर आम्हाला माहीत आहे की, हे पुढील काळात कोणते सिनेमा बनविणार आहेत. या दिवसांमध्ये असे सिनेमा बनविणे, ही एक फॅशन झाली आहे. सरकारने अभिनेते अनुपम खैर यांनाही राज्यसभेचे सदस्य बनवावे, नाही तर हे लोक देशात द्वेषात वातावरण निर्माण करतील”, अशी टीकाही लोन यांनी द काश्मीर फाईल्स या सिनेमावर केली.

“इथं सर्वांनी हा अत्याचार सहन केला आहे. सिनेमाच्या निर्मात्यांनी अतिरंजित करून ते मांडलं आहे. त्यांना माहीत नाही की, काश्मिरी पंडीत आजही आमच्यासोबत राहत आहेत. या लोकांना त्याविषयी काही विचार केला आहे का? ते आमचे बंधू आहेत आणि आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो. पण, १९९० दशकात आम्हीदेखील काश्मिरी पंडितांसाखरेत असह्य होतो”, असंही सज्जाद लोन यांनी म्‍हटलं आहे.

पाहा व्हिडिओ : इंधन दरवाढीचे चटके | Pudhari Podcast

Back to top button