‘नितीन गडकरी हे रस्त्यांचे जाळे विणणारे स्पायडरमॅन’, लोकसभेत विविध पक्षीय खासदारांनी केले कौतुक | पुढारी

'नितीन गडकरी हे रस्त्यांचे जाळे विणणारे स्पायडरमॅन', लोकसभेत विविध पक्षीय खासदारांनी केले कौतुक

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पायाभूत सुविधा क्षेत्रात चांगली कामगिरी करीत असल्याबद्दल स्वपक्षीय आणि विरोधी पक्षांचे नेते नेहेमी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक करीत असतात. असाच कौतुकाचा वर्षाव गडकरी यांच्यावर सोमवारी लोकसभेत विविध पक्षीय खासदारांनी अनुदान मागण्यांवरील चर्चेत सहभाग घेताना केला. विशेष म्हणजे अरुणाचल प्रदेशमधील भाजपचे खासदार तापिर गाव यांनी गडकरी यांचा उल्लेख ‘रस्त्यांचे जाळे विणारा स्पायडरमॅन’ असा केला.

चर्चेत सहभाग घेताना तापिर गाव म्हणाले की, गडकरी यांचे नाव मी स्पायडरमॅन असे ठेवले आहे, कारण कोळी ज्याप्रमाणे कमी वेळेत भरभर जाळे विणतो, त्याप्रमाणे गडकरी देशभरात रस्त्यांचे जाळे विणत आहेत. केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून चीनला लागून असलेल्या सीमेनजीक रस्त्यांची कामे वेगाने होत आहेत. स्पायडरमॅन गडकरींनी आपले काम यापुढेही असेच चालू ठेवावे. कारण त्याचमुळे देशाचा आणि ईशान्य भारताचा विकास होणार आहे.

चर्चेत सामील होताना विरोधी पक्षांच्या खासदारांनीही गडकरी यांच्या कामगिरीचे कौतुक केले. मात्र त्याचवेळी रस्ते सुरक्षेकडे विशेष लक्ष द्यावे, अपघात टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जाव्यात, अशा मागण्या केल्या. रस्त्यांचा दर्जा, देखभाल व कामकाजातील पारदर्शकता आदी मुद्देही विरोधकांकडून उपस्थित करण्यात आले.

हेही वाचलतं का?

Back to top button