ग्राहकांना फटका! ‘बल्क’ डिझेल महागले | पुढारी

ग्राहकांना फटका! ‘बल्क’ डिझेल महागले

नवी दिल्ली/मुंबई : पुढारी वृत्तसेवा

डिझेलची घाऊक खरेदी करणार्‍या ग्राहकांना तेल कंपन्यांनी दणका दिला असून, घाऊक खरेदीत लिटरमागे 28 रुपयांनी दर वाढविले आहेत. किरकोळ ग्राहकांसाठीचे पेट्रोल पंपावरील दर मात्र ‘जैसे थे’ आहेत. या दरवाढीचा परिणाम प्रवास भाडेवाढीत तसेच सिमेंट दरवाढीत होण्याची शक्यता आहे.मुंबईत घाऊक डिझेलचे दर 94.14 रुपयांवरून 122 रुपयांवर गेले आहेत. म्हणजेच 28 रुपयांनी दरवाढ झाली आहे. दिल्लीमध्ये घाऊक खरेदीदारांना आतापर्यंत 86.67 रुपये प्रतिलिटर या दराने डिझेलची विक्री केली जात होती; मात्र हा दर 115 रुपयांपर्यंत गेला आहे.

रशिया-युक्रेन युद्धामुळे गेल्या काही दिवसांत इंधन दर कडाडले आहेत. जागतिक बाजारपेठेत क्रूड तेलाचे प्रति बॅरलचे भाव 108 डॉलरवर गेले आहेत. मात्र असे असले तरी तेल कंपन्यांनी मागील नोव्हेंबर महिन्यापासून किरकोळ ग्राहकांसाठीच्या इंधन दरात वाढ केलेली नाही. बल्क खरेदीदारांना तेल कंपन्यांना वेगळ्या पद्धतीने इंधन पुरवठा करते. अशा ग्राहकांसाठीची इंधन साठ्याची व्यवस्थादेखील वेगळी असते.

खासगी कंपन्यांचे पंप बंद होण्याची शक्यता

चढ्या इंधन दरामुळे नायरा एनर्जी, जिओ-बीपी, शेल यांसारख्या खासगी इंधन विक्री कंपन्यांचा तोटा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. इंधन विकण्यापेक्षा पंप बंद ठेवणे अशा कंपन्यांसाठी जास्त संयुक्तिक बनले आहे. त्यामुळे लवकरच खासगी तेल विक्री कंपन्यांकडून आगामी काळात पंप बंद केले जाण्याची शक्यता आहे.

यांच्यासाठी डिझेल महाग

संरक्षण खाते, रेल्वे आणि वाहतूक महामंडळे, ऊर्जा प्रकल्प, सिमेंट कारखाने, रासायनिक प्रकल्प.

…तर पेट्रोल-डिझेल लिटरमागे 15 रुपयांनी महागले असते!

  • साधारणपणे कच्चे तेल बॅरलमागे एका डॉलरने वाढले तरी पेट्रोल-डिझेलमध्ये सरासरी 55 ते 60 पैसे लिटरमागे वाढ केली जाते.
  • या हिशेबाने आतापर्यंत पेट्रोल-डिझेलमध्ये 15 रुपयांपर्यंत लिटरमागे दरवाढ अपेक्षित होती, ती झालेली नाही. देशातील तेल कंपन्या यामुळे तोट्यात आहेत.
  • पाच राज्यांतील निवडणुका झालेल्या असल्या तरी पुढे 2023 मध्ये राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये निवडणुका आहेत. महागाईच्या आघाडीवर नामुष्की ओढवायला नको म्हणून सरकार दरवाढ होऊ नये, अशी व्यवस्था करते आहे.

Back to top button