हिजाब निकाल देणाऱ्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना जीवे मारण्याची धमकी | पुढारी

हिजाब निकाल देणाऱ्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना जीवे मारण्याची धमकी

बंगळूर; पुढारी ऑनलाईन : कर्नाटक हिजाब प्रकरणी निकाल देणाऱ्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना जीवे मारण्याच्या धमकी मिळाल्याची तक्रार आल्याने पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावर धमकीचा व्हिडिओ समोर आला होता, त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. १५ मार्च रोजी उच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थांमधील गणवेशाबाबत राज्य सरकारचा आदेश कायम ठेवला होता. सध्या याचिकाकर्त्यांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अधिवक्ता उमापती यांनी शनिवारी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरल यांच्याकडे या प्रकरणी तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार त्यांना व्हॉट्सअॅपवर एक व्हिडिओ सापडला ज्यामध्ये एक व्यक्ती मूख्य न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी यांना उघडपणे धमकावताना दिसत आहे. यादरम्यान तो झारखंडच्या न्यायाधीश यांच्या कथित हत्येचाही संदर्भ देत आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, ‘व्हिडिओमधील धमकावणारा व्यक्ती म्हणतो की, कर्नाटक उच्य न्यायालयाच्या न्यायमूर्तींनाही अशीच धमकी दिली आहे की ते कुठे फिरायला जातात हे लोकांना माहीत आहे’.

तो म्हणाला की त्या व्यक्तीने न्यायमूर्तींच्या कुटुंबातील सदस्यांसह उडुपी मठाच्या भेटीचा उल्लेख केला आणि न्यायालयाच्या निर्णयाबद्दल बोलताना अपमानास्पद भाषा वापरली. तमिळनाडूतील मदुराईमध्ये हा व्हिडिओ शूट करण्यात आला असावा, असेही तक्रारकर्त्याने म्हटले आहे.

आणखी एक वकील सुधा कात्वा यांनीही या व्हायरल व्हिडिओबाबत तक्रार दाखल केली आहे. मुख्य न्यायमूर्ती अवस्थी, न्यायमूर्ती कृष्णा दीक्षित आणि काझी एम झैबुन्निसा यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाने हिजाब प्रकरणी निकाल दिला होता.

हेही वाचा

Back to top button