गुलाम नबी आझादांनी घेतली सोनिया गांधींची भेट | पुढारी

गुलाम नबी आझादांनी घेतली सोनिया गांधींची भेट

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद शुक्रवारी पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी १० जनपथवर पोहोचले. या बैठकीत आझाद यांनी जी-23 गटाचे विचार सोनिया गांधींसमोर ठेवल्याचे मानले जात आहे. सोनियांना भेटण्यापूर्वी आझाद काँग्रेसचे ज्येष्ठ नेते करण सिंह यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि त्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.

याआधी गुरुवारी सोनिया गांधी यांनी आझाद यांच्याशी दोनदा फोनवरून चर्चा केली. दुसरीकडे, वायनाडचे काँग्रेस खासदार आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही बंडखोर छावणीतील भूपिंदरसिंग हुड्डा यांची भेट घेतली होती. दोघांमध्ये जवळपास ४५ मिनिटे भेट झाली.

पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत दारूण पराभवानंतर काँग्रेसमधील अस्वस्थता पुन्हा एकदा उघड झाली. त्यानंतर जी-२३ हा पक्ष पुन्हा एकदा सक्रिय झाला. या बंडखोर गटाने दोन दिवसांत दोन बैठका बोलावल्या. गुलाम नबी आझाद यांच्या घरी झालेल्या या बैठकांना कपिल सिब्बल, आनंद शर्मा, भूपिंदर सिंग हुड्डा, शशी थरूर, एमए खान, संदीप दीक्षित, विवेक तंखा, आनंद शर्मा, पृथ्वीराज चव्हाण, मणिशंकर अय्यर यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित होते.

या बैठकीनंतर काँग्रेसच्या जी-२३ नेत्यांचे संयुक्त निवेदन जारी करण्यात आले. भाजपला विरोध करण्यासाठी काँग्रेस पक्ष मजबूत करणे आवश्यक असल्याचे त्यात म्हटले आहे. आम्ही काँग्रेस पक्षाकडे २०२४ साठी विश्वासार्ह पर्यायाचा मार्ग मोकळा करण्याची आणि त्यासाठी एक व्यासपीठ तयार करण्याची मागणी करतो. तसेच आपल्या विचारसरणीशी सहमत असलेल्या इतर पक्षांशीही चर्चा सुरू करावी.

याआधी पक्षाचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी अलीकडेच एका मुलाखतीत गांधी कुटुंबाने काँग्रेसचे नेतृत्व सोडून दुसऱ्या नेत्याला संधी द्यावी, असे म्हटले होते. यानंतर गांधी कुटुंबाच्या जवळच्या समजल्या जाणाऱ्या काही नेत्यांनी सिब्बल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.

हे ही वाचलं का ?

Back to top button