महाराष्ट्रात ६१ हजार चौरस किलोमीटरहून अधिक नोंदणीकृत वनक्षेत्र | पुढारी

महाराष्ट्रात ६१ हजार चौरस किलोमीटरहून अधिक नोंदणीकृत वनक्षेत्र

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: देशात ३ लाख ७ हजार ७१३ चौरस किलोमीटर क्षेत्रासह एकूण क्षेत्रफळाच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्रात ६१ हजार ९५२ चौरस किलोमीटर एवढे नोंदणीकृत वनक्षेत्र आहे.

यात ५० हजार ८६५ चौरस किलोमीटर क्षेत्रावर राखीव जंगले, ६ हजार ४३३ चौरस किलोमीटर क्षेत्रावर संरक्षित जंगले आणि ४ हजार ६५४ चौरस किलोमीटर क्षेत्रावर बिगर वर्गीकृत वनक्षेत्र आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना दिली.

बिगर वर्गीकृत जंगलांमध्ये राखीव तसेच संरक्षित जंगलांचा भूभाग वगळता राज्य तसेच केंद्रशासित प्रदेश प्रशासनाच्या वन विभागाने नोंदणी केलेल्या इतर जंगलांचा समावेश होतो. तसेच, केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाकडे उपलब्ध माहितीनुसार, महाराष्ट्रातील वनक्षेत्रापैकी २२८.८१ हेक्टर भागावर अतिक्रमण करण्यात आले असल्याचे अश्विनी कुमार चौबे म्हणाले.

आयएफएसआर अर्थात भारतातील वनसंबंधी अहवाल, २०२१ नुसार, देशात एकूण ७ लाख ७५ हजार २८८ चौरस किलोमीटर क्षेत्र वनक्षेत्र म्हणून नोंदणीकृत झालेले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button