

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : विमान प्रवासादरम्यान (Air India Case) महिलेवर लघुशंका केल्याप्रकरणी अटकेतील आरोपी शंकर मिश्रा याला दिल्ली पोलिसांनी शनिवारी पटियाला हाउस न्यायालयात हजर केले. सुनावणी दरम्यान, पोलिसांनी आरोपीची तीन दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आरोपीची रवानगी आता तिहार कारागृहात केली जाईल. दरम्यान, आरोपीच्या वकिलाने जामीन अर्ज दाखल केला असून यावर ११ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.
न्यूयॉर्कवरुन दिल्लीला येत असलेल्या एअर इंडियाच्या (Air India Case) विमानात आरोपी मिश्राने पीडित महिलेवर लघुशंका केल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी त्याला बंगळुरूमधून तब्बल ४५ दिवसांनी अटक केली होती. यासंदर्भात त्याला दिल्लीत आणल्यानंतर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस ठाण्यात त्याची चौकशी करण्यात आली.
शुक्रवारी रात्री शंकर मिश्रा अटक करण्यात आली होती. बंगळुरूतील संजय नगर परिसरातील होमस्टेमध्ये तो लपून बसला होता. याप्रकरणात चौकशी सुरू असल्याची माहिती आयजीआय विमानतळाचे पोलीस उपायुक्त रवि सिंह यांनी दिली. या प्रकरणात काही क्रु मेंबर्स तसेच सहप्रवाशांना देखील चौकशीसाठी बोलावण्यात आले असल्याचे सिंह म्हणाले. पीडिता बातचीत करण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्यांच्यासोबत चर्चा करण्यात आलेली नाही. दरम्यान, त्यांच्या सोबतच्या तीन सहप्रवाशांची ओळख पटली असून, ते दिल्ली बाहेरचे असून त्यांच्या सुविधेनुसार चौकशीसाठी हजर राहतील, असे सिंह म्हणाले.
आरोपीने ३ जानेवारीला त्याचा फोन बंद केला होता. त्याचे शेवटचे लोकेशन बंगळुरू दाखवण्यात आले होते, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. दरम्यान पायलट तसेच को-पायलटसह एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना शुक्रवारी चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आला होता. परंतु, कर्मचारी हजर न राहिल्यांने त्यांना शनिवारी (दि.७) सकाळी साडेदहा वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. आरोपी मिश्राला पकडण्यासाठी महाराष्ट्र, बंगळुरू दिल्ली पोलिसांच्या पथकाने धाडी टाकल्या होत्या. आरोपी पसार झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांसह विविध लोकांची चौकशी करण्यात आली होती.
हेही वाचलंत का ?