पूरग्रस्त शेतकर्‍यांना ७०० कोटींची मदत | पुढारी

पूरग्रस्त शेतकर्‍यांना ७०० कोटींची मदत

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : पूरग्रस्त महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी केंद्र सरकारने 700 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी लोकसभेत मंगळवारी याबाबतची घोषणा केली. राज्यात अतिवृष्टी आणि पुराने हाहाकार उडविला असून, लाखो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती. विशेषतः, पश्‍चिम महाराष्ट्राला पुराचा मोठा फटका बसलेला आहे. पाऊस आणि पुरामुळे लाखो हेक्टर क्षेत्रावरील पिके वाहून गेली आहेत. शेतकर्‍यांचे यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे.

या पार्श्‍वभूमीवर लोकसभेत विरोधी पक्षांकडून सुरू असलेल्या गदारोळातच कृषिमंत्री तोमर यांनी निवेदन केले. महाराष्ट्रात आलेल्या पुरामुळे असंख्य लोकांचा मृत्यू झाला असून, हजारो कुटुंबांचे नुकसान झाले आहे. पुरामुळे, विशेषत: शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीचा सखोल अहवाल मिळाला आणि त्याचे विश्‍लेषण केले आहे. गृह मंत्रालयाने 700 कोटी रुपये मदत म्हणून मंजूर केले आहेत, अशी माहिती तोमर यांनी यावेळी दिली.

कृषी कायदे रद्द करण्यासह इतर मागण्यांवरून विरोधी पक्षांनी लोकसभेत प्रचंड घोषणाबाजी केली. त्यातच कृषिमंत्री तोमर बोलण्यासाठी उभे राहिले असता विरोधकांनी जास्तच गोंधळ घातला.

Back to top button