नवी दिल्ली : ठरावीक वाहनांसाठी ‘बीएच’ सीरिज नंबर प्लेट | पुढारी

नवी दिल्ली : ठरावीक वाहनांसाठी ‘बीएच’ सीरिज नंबर प्लेट

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : साधारणतः वाहन क्रमांकावरून संबंधित वाहन कुठल्या राज्यातील अथवा शहरातील आहे, हे कळते. परंतु, आता वाहन कुठल्या राज्यातील आहे हे सहजरीत्या ओळखता येणार नाही. तशा काही ‘नंबर प्लेट’ जारी करण्यात येणार आहेत. ‘बीएच’ म्हणजेच ‘भारत’ सीरिजचे हे क्रमांक केवळ केंद्र सरकार अथवा ज्या खासगी कंपन्यांची कार्यालये किमान चार वा त्याहून अधिक राज्यांत असतील, अशा कंपनीत कार्यरत वारंवार बदलीची शक्यता असणार्‍या कर्मचार्‍यांना देण्यात येईल.

दुसर्‍या राज्यांतील वाहन क्रमांक बघून वाहतूक पोलिसांकडून नाहक त्रास होणार नाही; तर दुसर्‍या राज्यात बदली झाली तरी संबंधितांना वाहन क्रमांक त्या राज्यातही मान्य राहील, असे दुहेरी फायदे या नवीन वाहन क्रमांकाच्या ‘सीरिज’मुळे होतील. चारचाकी वाहनांसह दुचाकी वाहनांसाठीदेखील या सीरिजचे क्रमांक देण्यात येतील. असे असले तरी या सीरिजकरिता ‘व्हीआयपी’ क्रमांक जारी केले जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. वारंवार एका राज्यातून दुसर्‍या राज्यात बदली होणार्‍या कर्मचार्‍यांना परिवहन मंत्रालयाच्या या निर्णयामुळे बराच दिलासा मिळेल, असे मत परिवहन तज्ज्ञांनी व्यक्त केले.

केंद्रीय परिवहन मंत्रालयाने संरक्षण क्षेत्रातील कर्मचारी, केंद्र व राज्य सरकारचे कर्मचारी, सार्वजनिक उपक्रम आणि खासगी क्षेत्रातील कंपनी तसेच संघटनांचे स्वामित्व असलेल्या खासगी वाहनांसाठी या सीरिजची सुरुवात केली आहे. या सीरिजची नंबर प्लेट पांढरीच राहणार असून त्यावर काळ्या रंगाने क्रमांक लिहिला जाईल. नंबर प्लेटवर सर्वात अगोदर वर्ष लिहिले जाईल. वाहन 2022 मध्ये नोंदणी झाले असेल तर सर्वात अगोदर 22 लिहिले जाईल. तद्नंतर बीएच लिहिले जाईल. यानंतर चार अंकी क्रमांक लिहिला जाईल.
पथकर निश्चित्त!

या सीरिज करिता मंत्रालयाने 10 लाखांपर्यंत किंमत असलेल्या वाहनांसाठी 8 टक्के, 10 ते 20 लाखांपर्यंतच्या वाहनांसाठी 10 टक्के आणि 20 लाखांहून अधिक किमतीच्या वाहनांसाठी 12 टक्के पथकर निश्चित केला आहे. डिझेल वाहनांसाठी अतिरिक्त 2 टक्के शुल्क आकारला जाईल तर इलेक्ट्रिक वाहनांवर 2 टक्के कमी कर आकारला जाईल, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

Back to top button