नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल (Exit Poll Results) जाहीर झाले आहेत. आतापर्यंत जाहीर झालेल्या 6 वर एक्झिट पोलनुसार, यूपीत पूर्ववत भाजपचे सरकार स्थापन होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. भाजपला 212 ते 262 जागांवर विजय मिळेल, तर अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाला 116 ते 161 जागा मिळतील, असा या एक्झिट पोल्सचा निष्कर्ष आहे.
यूपीप्रमाणेच उत्तराखंडमध्येही भाजपच पुन्हा सत्तेत येईल, असे दोन पोल सांगत आहेत, तर एका पोलनुसार, उत्तराखंडात काँग्रेसचे सरकार येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. दिल्लीपाठोपाठ पंजाब या राज्यामध्ये आम आदमी पक्षाला सत्तास्थापनेच्या संधीचा अंदाज बहुतांश एक्झिट पोलमधून वर्तविण्यात आला आहे. मणिपूरमध्ये भाजप बहुमताच्या जवळ असेल. मात्र, गोव्यात त्रिशंकू स्थिती राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
निवडणुकांचे निकाल येत्या 10 मार्चला गुरुवारी लागणार आहेत. तत्पूर्वी, विधानसभा निवडणुकांचे एक्झिट पोल आले आहेत. विविध संस्थांकडून आलेले हे एक्झिट पोल केले जातात. पंजाब वगळता उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये सध्या भाजपची सत्ता आहे. या राज्यांमध्ये भाजप आपली सत्ता कायम राखेल, असा दावा पक्षाने केलेला असला; तरी गोवा आणि मणिपूरबाबत एक्झिट पोल साशंक आहेत.
यूपी एक्झिट पोलवर एक दृष्टिक्षेप (Exit Poll Results)
* भाजपला 18 ते 22 जागांवर विजय मिळेल आणि आम्ही सरकार स्थापन करणार; गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा दावा
* न्यूज 24 आणि टुडेज चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार, उत्तराखंडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज; भाजपला 43 जागांवर विजय मिळण्याची शक्यता
* 'टाईम्स नाऊ'चा एक्झिट पोल; पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला 70 जागा मिळण्याची शक्यता
* टुडेज चाणक्यचा अंदाज, उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार येणार; भाजपला 43 जागांवर विजय, काँग्रेसला 24 जागा शक्य
* इंडिया टीव्ही आणि सीएनएक्स सर्व्हेनुसार, मणिपूरमध्ये भाजप बहुमताजवळ; भाजपला 26 ते 31 जागा, तर काँग्रेसला 12 ते 17 जागांवर विजय
* एकुणात एक्झिट पोलनुसार उत्तराखंडमध्ये भाजप सत्तेत येणार; भाजपला 37, काँग्रेसला 31 आणि आम आदमी पक्षाला एक जागा मिळणार
* एक्झिट पोलनुसार, गोव्यात भाजपला 16 ते 22 जागा मिळतील; काँग्रेसला 11 ते 17 जागांवर विजय मिळण्याची शक्यता
* इंडिया टीव्ही आणि सीएनएक्सच्या एक्झिट पोलनुसार, गोव्यात पुन्हा भाजप सरकार येण्याचा अंदाज
* 'इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडिया'नुसार, पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला 41 टक्के मतदान झाल्याचा अंदाज; 76 ते 90 जागांवर विजयाची शक्यता, काँग्रेसला 28 टक्के मतदानासह 19 ते 31, तर अकाली दलाला 19 टक्के मतदानासह 7 ते 11 जागा