पक्ष सोडून जाणाऱ्यांसाठी काँग्रेसचे दरवाजे कायमचे बंद : प्रियंका गांधी | पुढारी

पक्ष सोडून जाणाऱ्यांसाठी काँग्रेसचे दरवाजे कायमचे बंद : प्रियंका गांधी

नवी दिल्‍ली; पुढारी वृत्‍तसेवा उत्‍तर प्रदेश मध्ये काँग्रेसच्या प्रभारी प्रियंका गांधी यांनी आज पक्ष सोडणाऱ्यांना चांगलेच खडसावले आहे. पक्ष सोडणाऱ्यांना पुन्हा पक्षात घेतले जाणार नसल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे. त्‍या म्‍हणाल्‍या की, जोपर्यंत मी प्रभारी आहे तोपर्यंत अशा नेत्‍यांसाठी पक्षात कोणतीही जागा नाही. उत्‍तर प्रदेश निवडणुकांआधी अनेक नेत्‍यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्‍यावरून प्रियंका गांधी यांनी आज पक्ष सोडून जाणाऱ्यांना चांगलेच सुनावले.

एका वृत्‍तवाहिनीशी बोलताना त्‍यांनी सांगितले की, जे पक्ष सोडून गेले त्‍यांच्यासाठी पक्षाचे दरवाजे पुन्हा कधीच उघडणार नाहीत. जोपर्यंत मी प्रभारी आहे तोपर्यंत अशा लोकांना पक्षात कोणतीही जागा नसेल. जेंव्हा लढायचे होते, जेंव्हा हिंमत पाहिजे होती, तेंव्हा तुम्‍ही पळून गेलात. आज जे कार्यकर्ते लढत आहेत, पक्षातल्‍या पदांवर त्‍यांचा हक्‍क आहे.

पंजाब पासून उत्‍तर प्रदेश पर्यंत आणि पुन्हा उत्‍तर पूर्वेत तसेच देशाच्या प्रत्‍येक कोपऱ्यात काँग्रेसची हिच हालत आहे. मोठ-मोठे नेते पक्षाचा हात सोडत आहेत. ज्‍यामुळे पक्षाची ताकद कमी होत आहे. नुकतेच माजी कायदा मंत्री अश्वनी कुमार यांनीही पक्षाचा राजीनामा दिला होता. स्थापन झालेल्या नव्या काँग्रेसचे भवितव्य अतिशय अंधकारमय असल्याचा आरोप त्यांनी केला. पक्षाची रचनाच बरोबर नसेल, तर तुम्ही अडचणीत असाल. यापूर्वी आरपीएन सिंह यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता.

प्रत्‍येक राज्‍यात निवडणुकीच्या आधी आणि निवडणुकीनंतर काँग्रेस नेत्‍यांमध्ये धावपळ उडते. पक्षांतर्गत गटबाजी आणि पक्षात सन्मान मिळत नसल्‍याच्या कारणातून अनेक नेते काँगेसमधून बाहेर पडत आहेत. पंजाबपासून उत्‍तर प्रदेश आणि पुन्हा उत्‍तर पूर्व, देशाच्या प्रत्‍येक कोपऱ्यात काँग्रेसची अशीच परिस्‍थिती आहे.

Back to top button