निम्मी सांगली जलमय | पुढारी

निम्मी सांगली जलमय

सांगली; पुढारी वृत्तसेवा : निम्मी सांगली जलमय जलमय झाली आहे. कृष्णेच्या महापुराचे पाणी जास्तीत जास्त 50 फुटांपर्यंत जाईल आणि लगेच कमी होईल, असा अंदाज शनिवारी व्यक्त होत होता. मात्र, शनिवारी रात्रीच पाणी कमी न होता वाढत गेले. त्यामुळे त्या रात्रीत निम्मी सांगली पाण्याखाली गेली. त्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली.

रविवारी वीज आणि पाणी नसल्याने लोक घराबाहेर पडले. जास्त पाणी असलेल्या ठिकाणी अडकलेल्या अनेक लोकांना बोटीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात येत होते.

दरम्यान, पावसाने उघडीप देऊन, कराड, ताकारी येथे पाणी पातळी कमी झाली तरी सांगलीत मात्र पाणी पातळी कमी होत नसल्याने लोकांच्या चेहर्‍यावर भीती आणि चिंता कायम दिसत होती.

येथील सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, मगरमच्छ कॉलनी, काकानगर, दत्तनगरमध्ये शुक्रवारी महापुराचे पाणी घुसले. त्याशिवाय कर्नाळ रस्ता, जुना बुधगाव रस्ता पाण्याखाली गेला होता. पाणी पातळी 45 फुटांवर गेल्यानंतर शनिवारी राजवाडा चौक, स्टेशन रस्ता, बायपास, व्यंकटेशनगर, दत्तनगर, भारतनगर, पाटणे प्लॉट, हरिपूर रस्ता, गावभाग, कोल्हापूर रस्ता, काळीवाट, साई मंदिर परिसर, शंभर फुटी रस्ता, पत्रकारनगर, टिळक चौक, पांजरपोळ, गवळी गल्ली, कर्नाळ पोलिस चौकीचा परिसर, जुना बुधगाव रस्ता, ईदगाह मैदान, ट्रक पार्किंग, वखारभाग आदी भागात पाणी पसरले. शनिवारी रात्री पाणी पातळीत वाढ होऊन ती रविवारी सकाळपर्यंत 55 फूट झाली. त्यामुळे पाणी जवळजवळ शहराच्या निम्म्या भागात पसरले. बायपासकडून पाणी कलानगर, नवीन वसाहत, टिंबर एरिया, कॉलेज कॉर्नर, मीराहौसिंग सोसायटी, वखारभाग, आमराई, छत्रपती शिवाजी स्टेडियम आणि स्टेशन रस्त्यावरील विठ्ठल मंदिर या भागात पाणी गेले होते. मेगामॉलमध्येही पाणी गेले.

मटण मार्केट, रिसाला रस्ता, राजवाडा, मध्यवर्ती कारागृह, गणपती पेठ, हरभट रस्ता, कापडपेठ, गणपती मंदिर, दत्त-मारुती रस्ता, खणभागाचा पश्चिमेकडील भाग, मराठा समाज मंदीर परिसर, शंभरफुटी रस्ता, शामरावनगर आदि भागात पाणी पसरले. पाणी पसरत असल्याने त्या भागातील नागरिक धास्तावलेले दिसत होते. त्यांच्या चेहर्‍यावर चिंता दिसून येत होती. अनेक ठिकाणी साहित्य हलवण्यासाठी धावपळ सुरूच होती. तळघरातील साहित्य सुरुवातीस पहिल्या मजल्यावर घेण्यात आले होते. मात्र पाणी पातळीत होऊ लागल्यानंतर ते आणखी वरच्या मजल्यावर हालवण्यात येत होते. पाणी पातळीत आणखी वाढ होईल या भितीने अनेकांनी साहित्य इतर ठिकाणी स्तलांतर केले.

शामरावनगर, हरिपूर येथील जनावरे मार्केट यार्ड येथे हलवण्यात आली. त्या शिवाय अडकलेल्या लोकांना बाहेर काढले जात होते. महापालिकेच्या आठ आणि खासगी संस्थांच्या बोटीने हे काम सुरू होते. काहीजण टायर, काहिलीचा वापर करताना दिसत होते. महापूर पाहण्यासाठी काही ठिकाणी गर्दी होत होती. गर्दी टाळण्यासाठी पोलिस बंदोबस्त कडक होता. काही ठिकाणी पाण्यात तरुणांची हुल्लडबाजी सुरू होती. पाणी सर्वत्र घुसल्यामुळे काही ठिकाणी साप फिरताना दिसत होते.

सकाळी बाराच्या सुमारास महापौर दिग्वीजय सूर्यवंशी स्टेशन चौकात थांबून होते. महापुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी ते सूचना ते देत होते.

जुना बुधगाव रस्ता पाण्याखाली गेल्याने रस्त्याकडील वाहनांचे गॅरेज, वाहने, भंगार, बांबूचे साहित्य पाण्याखाली गेले.

स्थलांतरित केलेल्या लोकांची व्यवस्था स्फूर्ती चौक, वारणाली, साखर कारखाना , गारपीर, पंचशीलनगर, चांदणी चौक येथील महापालिकेच्या शाळेत शिवाय राजमती हायस्कूल, दामाणी हायस्कूल या ठिकाणी करण्यात आली आहे. पाळीव जनावरांची व्यवस्था टिंबर एरिया, ओव्हरसियर कॉलनीतील महापालिकेच्या शाळा परिसरात करण्यात आली आहे. त्या ठिकाणी त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे.

घरात पाणी आलेल्या काही लोकांनी विश्रामबाग, विजयनगर परिसरात खोली भाड्याने घेऊन स्थलांतर केले.

नुकसानीच्या भीतीने डोेळ्यांत अश्रू

कोरोना संसर्गामुळे अनेक दिवसांपासून दुकाने बंद आहेत. त्यातच महापुराचे पाणी आल्यामुळे व्यवसायाचे आणि दुकानांचे नुकसान होत आहे, त्यामुळे व्यापारी व्यथित झाल्याचे दिसत होते. गेल्या वेळी पूर येऊन गेल्यानंतर बाजारपेठीतल अनेकांनी दुकानांचे नूतनीकरण केले होते. यावेळी दुकानात पुन्हा जवळजवळ तेवढेच पाणी गेल्याने त्यांच्या डोळ्यांत अश्रू दिसत होते.

Back to top button