बनारस (दिगंबर दराडे) : बनारस उर्फ काशी उर्फ वाराणसी… या प्राचीन अध्यात्मिक, सांस्कृतिक शहराशी मराठी मंडळींचे नाते अनेक शतकांपासूनचे. याच वाराणसीच्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होम ग्राउंडवरील रणधुमाळीमध्ये आपल्या महाराष्ट्रातील एक महिला नेत्या प्रभावी भूमिका निभावत आहे. त्यांचे नाव विजया रहाटकर.(Vijaya Rahatkar)
भाजपच्या राष्ट्रीय सचिव, महाराष्ट्र महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा व औरंगाबादच्या माजी महापौर असलेल्या विजया रहाटकर (Vijaya Rahatkar) इथे वाराणसीत तळ देऊन बसल्या आहेत. फक्त वाराणसी नव्हे, तर या विभागातील नऊ जिल्ह्यांमधील महिला कार्यकर्त्यांच्या समन्वयाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. त्याचबरोबर साहित्यकार, कलाकार, डॉक्टर, प्राध्यापक, उद्योजक यासारख्या प्रभावशाली मतदारांशी संवाद साधण्याची जबाबदारीही पक्षाने त्यांच्याकडे सोपविली आहे. वाराणसीला मुक्काम हलवण्यापूर्वी त्या लखनौ, अयोध्या, प्रयागराजमध्ये बसून समन्वयाची जबाबदारी पार पाडत होत्या. सुमारे महिनाभरापासून त्या उत्तर प्रदेशात आहेत.
वाराणसीतील एका हॉटेलमध्ये त्यांची भेट झाली, तेव्हा त्या विविध बैठकांमध्ये व्यस्त होत्या. 'पुढारी'शी त्यांनी संवाद साधला. मोदी-योगी डबल इंजिन सरकार पुन्हा येणार असल्याबद्दल त्या अगदी ठाम आहेत. त्या म्हणाल्या, गेल्या पाच वर्षांत योगी सरकारने उत्तर प्रदेशचा चेहरामोहरा बदलून टाकलाय. जीडीपी दुप्पट झालाय. कोरोनाच्या संकटातही बेरोजगारीचा दर १७ टक्क्यांवरून फक्त ४.५ टक्क्यांवर आलाय. हे राज्य देशातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनले आहे. या ही पलीकडे जाऊन कणखर कायदा व सुव्यवस्था हे योगी सरकारचे सर्वांत बलस्थान राहिले आहे. जनतेला समाजवादीचे गुंड नको आहेत.
यूपीत पुन्हा भाजपला यश मिळवून देण्यात महिला सर्वाधिक पुढे असतील, असेही त्या म्हणाल्या. त्याचे कारण सांगताना त्या म्हणाल्या, दीड कोटी घरांमध्ये वीज कनेक्शन, ४० लाख गरिबांना घरे, २९ लाख घरांमध्ये नळाने शुद्ध पाणीपुरवठा, सुमारे एक कोटी जनधनची खाती, उज्ज्वला योजनेचा लाखोंना लाभ यामुळे महिला मोदींसोबत आहेत. योगींनी त्या सुरक्षा दिलीय. कोरोना काळात मोदी सरकारने दिलेल्या मोफत धान्यांमुळे महिला समाधानी आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पहा व्हिडिओ