चित्रा रामकृष्ण : सिद्धयोगी बोले, शेअर बाजार चाले!

चित्रा रामकृष्ण : सिद्धयोगी बोले, शेअर बाजार चाले!

नवी दिल्ली ; पुढारी डेस्क : हिमालयात वास्तव्यास असलेल्या एका रहस्यमय योगीपुरुषाच्या आदेशानुसार राष्ट्रीय शेअर बाजारातील (नॅशनल स्टॉक एक्स्चेंज) व्यवहार चालत असल्याचा गौप्यस्फोट गेल्या आठवड्यात सेबीने (नॅशनल सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया) केला आणि चित्रा रामकृष्ण हे नाव चर्चेत आले. सेबीने तीन कोटी रुपयांचा दंड ठोठावलेल्या, आयकर विभागाने छापे घातलेल्या आणि केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) कठोर निर्बंध घातलेल्या या चित्रा रामकृष्ण आहेत तरी कोण आणि त्यांनी नेमके केले तरी काय, याचा हा संक्षिप्त आढावा.

'शेअर बाजारांची राणी' असा गाजावाजा एकेकाळी करण्यात आलेल्या चित्रा रामकृष्ण 2013 ते 2016 पर्यंत राष्ट्रीय शेअर बाजाराच्या मुख्य कायकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालक (एमडी) होत्या. संयुक्त व्यवस्थापकीय संचालक म्हणून 2009 मध्ये त्यांची नियुक्ती झाली होती. मात्र, पदाचा गैरवापर केल्यामुळे आणि एका घोटाळ्यात नाव आल्यामुळे 2016 मध्ये त्यांची एनएसईमधून हकालपट्टी झाली. चित्रा यांनी 2013 ते 2016 या काळात घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे शेअर बाजारांचे अतोनात नुकसान झाल्याचा आरोप आहे. त्यांचा असाच एक निर्णय म्हणजे त्यांनी केलेली आनंद सुब्रमण्यम यांची नियुक्ती. याच मुद्द्यावरून सेबीने चित्रा रामकृष्ण यांच्या कारभाराची चौकशी सुरू केली होती.

चित्रा यांनी 1 एप्रिल 2013 रोजी आनंद सुब्रमण्यम यांना एनएसईमध्ये चीफ स्ट्रॅटेजिक अ‍ॅडव्हायजर (सीएसए) म्हणून आणले आणि 1 एप्रिल 2015 रोजी ग्रुप ऑपरेटिंग अ‍ॅफिसर (जीओओ) पदावर बढती दिली. त्याचप्रमाणे सीईओ-एमडी यांच्या सल्लागाराची जबाबदारीही 'सुब्बू' यांना देण्यात आली. एनएसईमध्ये येण्यापूर्वी आनंद सुब्रमण्यम यांना भांडवल बाजारातील कामाचा कोणताही अनुभव नव्हता.

बामर लॉरी कंपनीत 15 लाख रुपये वार्षिक पगारावर काम करणार्‍या 'सुब्बू' यांना चित्रा यांनी एनएसईमध्ये मोठ्या पदावर नियुक्त करून वर्षाला 1.68 कोटी रुपयांचे पॅकेज दिले. या भारीभक्कम वेतनासाठी त्यांना आठवड्यातील फक्त चार दिवस काम करावे लागत असे. दोनच वर्षांत आनंद यांचे वेतन वाढवून 4.12 कोटी करण्यात आले. त्यांची नियुक्ती करण्यापूर्वी कोणतीही जाहिरात अथवा नोटीस प्रसिद्ध करण्यात आली नव्हती. चित्रा यांनी थेट मुलाखत घेऊन त्यांची नेमणूक केली; त्या मुलाखतीचा कोणताही तपशील सुब्रमण्यम यांच्या फाईलमध्ये आढळत नाही.

एनएसईमध्ये कोण कोणत्या पदावर आहे, पदाधिकार्‍यांची कामे काय आहेत, लाभांशाची स्थिती, वित्तीय परिणाम, मनुष्यबळ विभागाची धोरणे, नियामकांना दिलेली माहिती असा संपूर्ण संवेदनशील तपशील त्यांनी एका अज्ञात व्यक्तीला दिल्याचे सेबीने केलेल्या चौकशीत उघड झाले. त्यातूनच समोर आले की, rigyajursama अशा नावाच्या ई-मेल आयडी असलेल्या एका रहस्यमय व्यक्तीशी त्यांनी ही गोपनीय माहिती 'शेअर' केली होती. हे सिद्धपुरुष योगी आपल्याला 20 वर्षांपासून मार्गदर्शन करतात, असेही चित्रा यांनी सेबीला सांगितले. सुब्रमण्यम यांची नियुक्ती तसेच अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांच्या पदोन्नतीबाबतही हाच योगी वारंवार सल्ला देत असे. विशेष म्हणजे हे ई-मेल चित्रा यांच्याबरोबर 'सुब्बू' यांनाही पाठवले जात असत.

दरम्यान, चित्रा रामकृष्ण यांच्यावर शेअर बाजारांशी संबंधित कोणतीही संस्था अथवा सेबीकडे नोंदणीकृत कोणत्याही मध्यस्थ संस्थेमध्ये सहभागी होण्यास तीन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. रामकृष्ण यांना शिल्लक रजांपोटी दिलेले 1.54 कोटी रुपये वसूल करावेत तसेच 2.83 कोटी रुपयांची बोनस रक्कम देऊ नये, असे स्पष्ट आदेश आहेत. त्याचप्रमाणे रवि नारायण आनंद आनंद सुब्रमण्यम यांना प्रत्येकी दोन कोटी रुपये दंडासह शेअर बाजारांशी संबंधित कोणतीही संस्था अथवा सेबीकडे नोंदणीकृत कोणत्याही मध्यस्थ संस्थेमध्ये सहभाग होण्यावर अनुक्रमे दोन वर्षे आणि तीन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे एनएसईने सहा महिने कोणतेही नवे उत्पादन 'लाँच' करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.

सुब्रमण्यम आणि सिद्धपुरुष एकच व्यक्ती

या सुरस कथानकातील 'ट्विस्ट' म्हणजे एका कथित सिद्धपुरुषाच्या आदेशांवरून चित्रा महत्त्वाचे निर्णय घेत असल्याचे अधिकार्‍यांना माहीत असल्याचे सेबीचे म्हणणे आहे. 'त्या' ई-मेल आयडीवरून रामकृष्ण यांना आदेश देणारा योगी-सिद्धपुरुष-आध्यात्मिक गुरू म्हणजे अन्य कोणीही नसून खुद्द आनंद सुब्रमण्यम हाच असल्याचे अर्न्स्ट अँड यंग या सल्लागार संस्थेने केलेल्या फॉरेन्सिक ऑडिटमध्ये उघड झाले. सुब्रमण्यमने नवी ओळख तयार करून चित्रा यांच्यावर प्रभाव टाकला आणि स्वहिताचे निर्णय घेतल्याचे मनोवैज्ञानिकांनी सांगितले.

'चित्रा'मय कारकीर्द

भारतीत शेअर बाजाराच्या मुख्याधिकारीपदी नियुक्ती झालेली पहिली महिला.
वयाच्या 21 व्या वर्षी चार्टर्ड अकाऊंटंट आणि 1985 मध्ये इंडस्ट्रियल डेव्हकपमेंट बँकेत साहाय्यक व्यवस्थापक म्हणून नेमणूक.
1980 च्या दशकात सेबीच्या कायदेशीर संरचनेचा आराखडा तयार करण्यात सहभाग, स्थापनेपासून सेबीशी संबंध.
देशव्यापी व्ही-सॅट नेटवर्क स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका, फ्यूचर्स व ऑप्शन्स, ईटीएफ आदी उत्पादनांच्या कार्यान्वयनावर देखरेख.
2013 मध्ये 'फोर्ब्ज विमेन लीडर ऑफ द इयर' पुरस्कार; 'फार्च्युन इंडिया'कडून भारताच्या रोखे बाजारातील सर्वांत शक्तिशाली महिला असा गौरव.

काय आहे सेबीच्या 190 पानी आदेशात?

सुब्रमण्यम हाच rigyajursama या ई-मेल आयडीचा वापरकर्ता असल्याचे फॉरन्सिक ऑडिटमध्ये निष्पन्न झाले . एनएसईचा बिझनेस प्लॅन, लाभांश वितरण, संचालक मंडळाच्या बैठकांचा अजेंडा, कर्मचारी-अधिकार्‍यांची बढती अशी गोपनीय माहिती तब्बल पाच वर्षे बाहेरील अज्ञात व्यक्तीला पुरवण्यात आल्याचे मात्र त्या अहवालातून नि:संदिग्धपणे समोर येते. एनएसईचे तत्कालीन व्हाईस चेअरमन रवि नारायण यांना या सर्व प्रकारांची जाणकारी होती; मात्र त्यांनी 21 ऑक्टोबर आणि 9 नोव्हेंबर 2016 रोजीच्या बैठकांमध्ये हा मुद्दा मांडलाच नाही, असे सेबीने म्हटले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news