Panjab Election : प्रचारच्या अखेरच्या टप्प्यात तापतोय ‘उडता पंजाब’चा मुद्दा | पुढारी

Panjab Election : प्रचारच्या अखेरच्या टप्प्यात तापतोय ‘उडता पंजाब’चा मुद्दा

पंजाब विधानसभा निवडणुकीसाठीच्या ( Panjab Election ) मतदानाला अवघे 4 दिवस शिल्लक असताना सर्वच राजकीय पक्षांनी ‘उडता पंजाब’च्या मुद्द्यावर उड्या घेतल्या आहेत. या मुद्द्याने पुन्हा एकदा जोर धरल्याने वातावरण तापले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधींच्या दौर्‍यानंतर राज्याला बसलेल्या ड्रग्सच्या विळख्याबद्दल जोरात चर्चा सुरू झाली आहे. व्यसनाधीन तरुण हा राज्यातील प्रमुख सामाजिक आणि राजकीय मुद्दा आहे. पाकिस्तानला लागून राज्याच्या सीमा असल्याने येथील तरुणांना आंतरराष्ट्रीय षड्यंत्रातून ड्रग्सच्या आहारी घातले जात आहे. ‘उडता पंजाब’ चित्रपटातून हे भीषण वास्तव्य मांडले होते. राज्यातील जवळपास सर्वच घरांना अंमली पदार्थांचा विळखा बसल्याचे दिसते. 80 च्या दशकातील दहशतवादाप्रमाणे आता अमली पदार्थांच्या व्यसनाचा मुद्दा चिंतेचा विषय ठरत आहे.

काँग्रेसने कॅप्टन अमरिंदर सिंह यांना सप्टेंबर 2021 मध्ये मुख्यमंत्री पदावरून हटवले आणि चन्नी यांना मुख्यमंत्री बनवले. ते राज्यातील पहिले दलित मुख्यमंत्री ठरले. त्यांनी 100 दिवसांत एक ‘नायक’ म्हणून स्वत:ला सादर केले. अमली पदार्थांसंबंधी स्थापन केलेल्या विशेष तपास समितीच्या अहवालाआधारे शिरोमणी अकाली दलाचे नेते विक्रमसिंह मजीठिया यांच्याविरोधात मोहाली जिल्ह्यात 20 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला. मजीठिया यांना तूर्त सर्वोच्च न्यायालयाने संरक्षण दिले असले तरी त्यांच्यावर प्रथमच कठोर कायदेशीर कारवाई झाल्याने राजकीय वातावरण तापले होते. मजीठिया अमृतसर जिल्ह्यातील मजिठा विधानसभा मतदारसंघाचे 2007 पासून प्रतिनिधित्व करीत आहेत. पाकिस्तान सीमेलगत हा भाग असल्याने येथून सातत्याने ड्रग्स तस्करीचा आरोप होतो. यंदाही मजिठातून मजीठिया रिंगणात उतरले होते. परंतु, राजकीय व्यूहरचनेच्या आधारे ते आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू यांच्याविरोधात अमृतसर (पूर्व) मधून लढत आहेत. मजिठामधून मजीठिया यांची पत्नी निवडणूक लढवणार आहे. ( Panjab Election )

नुकत्याच झालेल्या होशियारपूर येथील सभेतून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘उडता पंजाब’चा उल्लेख केला. 2013 मध्ये पंजाबमधील ड्रग्स तस्करीचा मुद्दा उपस्थित करताना राहुल गांधी म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्याला ड्रग्समुक्त बनवण्याचे आश्वासन देत आहे. परंतु, यापूर्वी भाजप सत्तेत राहून अकाली दलाचे संरक्षण करीत होते. काँग्रेसने ड्रग्स माफियांवर कारवाई केली. त्यामुळे आता राज्यातून ड्रग्सचा नायनाट केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील जालंधर येथील सभेतून राज्याला ड्रग्समुक्त करण्याचे आश्वासन दिले. ड्रग्स माफियांचा बिमोड करण्यात कुठलीही कसर सोडणार नाही. गाडी-बंगला चांगले आर्थिक स्थैर्य असतानादेखील घरातील तरुण मुले ड्रग्सच्या आहारी जात असतील तर या सर्वाचा काय फायदा? असा सवाल उपस्थित करीत पंजाबचे आपल्यावर असलेले ऋण फेडणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले. ( Panjab Election )

काँग्रेस आणि भाजप नेते एकमेकांवर आरोपाच्या फैर्‍या झाडत असले तरी राज्याच्या निवडणुकीत सध्या ‘उडता पंजाब’च्या अवतीभवती प्रचार एकवटल्याचे दिसून येतोय. हा मुद्दा काँग्रेसला राजकीय फायदा पोहोचवू शकतो. काँग्रेसअंतर्गत गटबाजीवरून लोकांचे लक्ष हटवण्यासाठी हा मुद्दा महत्त्वाचा ठरत आहे. नवज्योतसिंह सिद्धू देखील या मुद्द्यापासून स्वत:ला दूर ठेवू शकत नसल्याचे दिसून येत आहे.

 

Back to top button