गोव्याची वाटचाल त्रिशंकू विधानसभेच्या दिशेने | पुढारी

गोव्याची वाटचाल त्रिशंकू विधानसभेच्या दिशेने

ज्ञानेश्वर बिजले

गोव्यात भाजपच्या हातातून सत्ता निसटत आहे, तर काँग्रेसला ती घेता येत नाही, अशी त्रिशंकू स्थिती निवडणूक प्रचाराची सांगता होताना शनिवारी (दि. 12 फेब्रुवारी) दिसून येत आहे. तसे झाल्यास, लहान पक्षांचे आमदार आणि निवडून येणाऱ्या अपक्षांना महत्त्व प्राप्त होईल. अत्यल्प मताधिक्यांनी विजयी होणाऱ्या उमेदवारांमुळे येथील निकालाचे पूर्वानुमान काढणे तसे कठीणच आहे. गोव्यात काँग्रेस आणि भाजप यांच्यात पारंपरीक लढत होत असताना, स्थानिक महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, गोवा फॉरवर्ड पक्ष हे सत्ता स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावतात. दिल्लीतील आम आदमी पक्ष, तसेच यंदा पश्चिम बंगालची तृणमूल काँग्रेस गोव्यातील निवडणूक रिंगणात उतरल्यामुळे लढतीची रंगत वाढली आहे.

गोव्यातील निवडणुकीची स्थिती

गोवा तसे लहान राज्य. एकूण चाळीस आमदार. 11 लाख साठ हजार मतदार. सर्वसाधारणपणे प्रत्येक मतदारसंघातील मतदार संख्या सरासरी तीस हजारच्या आसपास. गेल्या निवडणुकीत सर्वांत कमी मतांनी म्हणजे 33 मतांनी एक आमदार विजयी झाले, तर एक हजारापेक्षा कमी मताधिक्यांनी सातजण निवडून आले. दहा हजारपेक्षा जास्त मताधिक्यांनी मगोपचे सुदीन ढवळीकर हे एकमेव आमदार निवडून आले. ही आकडेवारी पाहिल्यास, तेथील निवडणुकीतील चुरस लक्षात येते. मतदारांचा एखादा गट, भाग नाराज झाला, कोणी नवख्या उमेदवारांनी थोडीफार मते घेतली, तरी निकालावर थेट परीणाम होतो. त्यामुळे येथील निवडणुकीत जाहीर सभेपेक्षा घऱोघरी प्रचार करीत मतदारांशी थेट संपर्क करण्यावरच उमेदवारांचा भर असतो.

यंदाच्या निवडणुकीतील वेगळेपण

भाजप सर्व 40 जागा लढवत आहे, तर काँग्रेस 37 जागा लढविताना त्यांनी आघाडी करीत विजय सरदेसाई यांच्या गोवा फॉरवर्ड पक्षाला तीन जागा दिल्या आहेत. पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा येथे तळ ठोकून आहेत. तृणमूलचे 26 उमेदवार असून, त्यांनी आघाडीतील मगोप या गोव्यातील स्थानिक पक्षाला तेरा जागा दिल्या आहेत. आप 39 जागा लढवित असून, एका अपक्षाला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस बारा जागांवर, शिवसेना नऊ जागांवर निवडणूक लढवित आहे. एकूण 301 उमेदवार रिंगणात आहेत.

गेल्या निवडणुकीतील चित्र

गेल्या निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक 17 जागा मिळविल्या, मात्र, भाजपचे तेरा आमदार असतानाही त्यांनी सत्ता स्थापन केली. त्यांनी अन्य पक्षांचा पाठिंबा मिळविला. त्यावेळी, गोवा फॉरवर्ड पक्षाचे तीन, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आणि तीन अपक्ष आमदार निवडून आले होते. त्यानंतर सध्याची निवडणूक येईपर्यंत माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत हे एकमेव आमदार सोडल्यास, क़ाँग्रेसच्या बाकी आमदारांनी पक्ष सोडला. आता जुन्यापैकी एक आमदार पुन्हा काँग्रेसमध्ये आले व निवडणुकीच्या रिंगणात उतरले. गोव्यात 2017 च्या निवडणुकीत भाजपला 2.97 लाख मते, काँग्रेसला 2.59 लाख, मगोपला 1.03 लाख, अपक्षांना 1.01 लाख मते मिळाली होती. आपला 57 हजार, गोवा फॉरवर्ड पक्षाला 31 हजार, राष्ट्रवादी काँग्रेसला 21 हजार मते मिळाली होती. एकूण मतदान 9.16 लाख म्हणजे 82.56 टक्के झाले होते.

भाजपची बांधणी

ही पार्श्वभूमी लक्षात घेत गोवा निवडणुकीकडे पाहिले पाहिजे. भाजपचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन झाल्याने, भाजपची मोठी हानी झाली. गेली 25 वर्षे पर्रीकर यांनी गोव्यात पक्षबांधणी केली होती. त्यातच पर्रीकर यांचा मुलगा उत्पल यांनी उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष म्हणून पणजीतून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. भाजपचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर गेल्या निवडणुकीत पराभूत झाले. तेही उमेदवारी न मिळाल्याने, यंदा अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांंनाही अटीतटीच्या लढतीला तोंड द्यावे लागत आहे.

पर्रीकर यांच्या निधनामुळे गोव्यात भाजपकडे सक्षम नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपचे प्रभारी म्हणून निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत. त्यांच्यासमवेत महाराष्ट्रातील तरूण आमदारांची फौज गोव्यात तळ ठोकून आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी यांच्या सभा झाल्या. भाजपला निवडणुकीत यंदा मोठे आव्हान मिळाल्याचे दिसून येते.

काँग्रेसची तयारी

काँग्रेसची गोव्यात चांगली स्थिती असली, तरी गेल्यावेळी निवडून आलेल्या बहुतेकांनी पक्ष सोडला. यावेळी नव्या चेहऱ्यांसह काँग्रेस उतरली आहे. आमदार झाल्यावर पक्ष सोडू नये, यांसाठी त्यांनी उमेदवारांकडून शपथ वदवून घेतली.राहुल गांधी, प्रियांका गांधी यांचे दौरे झाले. कर्नाटकातील काँग्रेसचे नेते व काही आमदार गोव्यात तळ ठोकून आहेत. महाराष्ट्रातूनही नेते प्रचाराला पोहोचले आहेत. सध्या तरी काँग्रेसची स्थिती चांगली आहे.

आप व तृणमूल

या दोन्ही पक्षांमुळे येथील राजकीय वातावरण ढवळून गेले आहे. आपचे एक-दोन उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. तृणमूलचे जोरदार प्रचार केला असली, तरी त्यांना फारसे यश मिळण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा आहे, मगोप काही जागा निश्चित मिळवेल.

ख्रिश्चन मतदारांची भूमिका

राज्यात 66 टक्के हिंदू, तर 25 टक्के ख्रिश्चन लोकसंख्या आहे. आठ टक्के मुस्लीम समाज आहे. ख्रिश्चन समाजाचे काँग्रेस ध्रुवीकरण करीत असल्याचा आरोप भाजपचे नेते करीत आहेत. त्याचवेळी प्रियांका गांधी यांनी ख्रिश्चनांची जादा लोकवस्ती असलेल्या भागात प्रचारफेरी काढीत मतदारांशी संवाद साधला. काँग्रेसने या समाजाच्या सोळाजणांना उमेदवारी दिली आहे, तर भाजपनेही अकरा जणांना उमेदवारी दिली आहे. अन्य पक्षांनीही या समाजाचे उमेदवार उभे केले आहेत. ख्रिश्चन मतदारांचा कल काँग्रेसच्या बाजूने झुकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या समाजाच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

त्रिशंकू स्थिती निर्माण होण्याची चर्चा

सत्ताधारी भाजपचे चौदा-पंधरा उमेदवार निवडून येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे. काँग्रेसही त्या आसपासच जागा जिंकेल, अशी चर्चा आहे. अशी त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास, सत्ता स्थापनेसाठी उर्वरीत दहा आमदारांना महत्त्व प्राप्त होईल. गेल्यावेळी गोवा फॉरवर्ड पक्षाने भाजपला पाठिंबा दिला होता, यंदा त्यांची काँग्रेससोबत आघाडी आहे. जुना प्रादेशिक पक्ष असलेला मगोप यंदा तृणमूल सोबत आहे. त्यामुळे निवडणुकीनंतरची स्थिती खूपच गुंतागुंतीची होण्याची शक्यता आहे.

अपक्ष आमदारांना महत्त्व प्राप्त होणार आहे, त्यामुळे भाजप व काँग्रेसचे नेते आत्ताच विजयी होणाऱ्या संभाव्य विरोधी उमेदवारांवर लक्ष ठेवू लागले असल्याची चर्चा आहे. गोव्यात निवडून आल्यानंतर पक्ष बदलण्याच्या व सत्ताधारी पक्षांत जाण्याच्या घटना गेल्या निवडणुकीनंतर घडल्या. यावेळीही तसे प्रकार होण्याची शक्यता चर्चिली जात आहे. मात्र, येथील निवडणुकीतील मताधिक्य हे एक हजाराच्या आसपास असल्याने निकालाचा निश्चित अंदाज बांधणे खूपच कठीण ठरते. त्यामुळे दहा मार्चलाच स्थिती स्पष्ट होईल.

Back to top button