Earthquake : जम्मू-काश्मीरसह दिल्ली परिसर भूकंपाने हादरला | पुढारी

Earthquake : जम्मू-काश्मीरसह दिल्ली परिसर भूकंपाने हादरला

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : पाकिस्तानसह भारतातील जम्मू-काश्मीर आणि दिल्ली परिसर आज भूकंपाने हादरला. देशाच्या उत्तरेच्या भागातील दिल्ली, जम्मू-काश्मीर, पंजाब या भागात भूकंपाचे मोठे धक्के बसले. काही भागाात ५.३ तर काही ठिकाणी ७.३ रिश्टर स्केलचे धक्के बसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, यामध्ये जीवितहानी झाल्याचे अद्याप वृत्त नाही. (Earthquake)

राष्ट्रीय भूकंपमापन सेंटरच्या माहितीनुसार, सकाळी ९.४५ वाजता जम्मू-काश्मीरमधील गुलमर्गपासून 395 किलोमीटर वायव्येस आणि श्रीनगरपासून ४२२ किमी वायव्येस भूकंप झाल्याची नोंद झाली. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.७ एवढी होती. भूगर्भात १८१ किमी खोलीवर झालेल्या या भूकंपाने जम्मू- काश्मीरसह आणि दिल्ली एनसीआरच्या काही भागात हादरे बसले.

तसेच सकाळी ९.४५ वाजता अफगाणिस्तानमधील काबुलच्या ईशान्येस २५९ किमी, ताजिकिस्तानमधील दुशान्बेपासून आग्नेय दिशेस ३१७ किमी आणि पाकिस्तानमधील इस्लामाबादच्या उत्तर-वायव्येस ३४६ किमी अंतरावर भूकंपाची नोंद झाली आहे.

भूकंपाच्या संदर्भात, नोएडामधील काही लोकांनी ट्विट करत जमीन किमान २० सेकंदांपर्यंत हादरली असल्याचे म्हटले आहे. दिल्लीतील लोकांनीही त्यांना भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती दिली आहे.

दिल्लीला लागून असलेल्या शहरातील रहिवासी शशांक सिंह म्हणाले, मला माझे डोके फिरत असल्याचे जाणवले. यामुळे मी माझे डोळे बंद करू लागलो, जेव्हा मी अचानक पंख्याकडे पाहिले आणि मला जाणवले की हा भूकंप आहे.

नोएडामध्ये सुमारे २५ जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. यामध्ये 30 सेकंदांपर्यंत हे धक्के असल्याचे त्यांनी सांगितले. (Earthquake)

Back to top button