महाराष्ट्राच्या एकूण १४ सेना व नौदलाच्या अधिकारी-जवानांना ‘शौर्य पदक’! | पुढारी

महाराष्ट्राच्या एकूण १४ सेना व नौदलाच्या अधिकारी-जवानांना ‘शौर्य पदक’!

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

लष्कराच्या सेनाधिकारी व महाराष्ट्र कन्या ले. जनरल माधुरी कानिटकर (सेवानिवृत्त), ले. जनरल मनोज पांडे तसेच नौदलाचे व्हाईस ॲडमिरल सतिशकुमार घोरमाडे यांना ‘परम विशिष्ट सेवा पदक’ जाहीर झाले असून मुळचे महाराष्ट्राचे असलेल्या अन्य ११ अधिकारी व जवानांना ‘शौर्य पदक’ जाहीर झाले आहेत.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज लष्कराच्या एकूण ३१७ आणि नौदलाच्या एकूण ३४ सेनाधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेसाठी ‘शौर्य पदक’ मंजूर केले आहेत. या पदकांमध्ये २२ ‘परम विशिष्ट सेवा पदक’ (पीव्हीएसएम), ४ ‘उत्तम युध्द सेवा पदक’(युवायएसएम), ४० ‘अती विशिष्ट सेवा पदक’(एव्हीएसएम), ६ ‘शौर्य चक्र’, ८४ ‘सेना पदक’ (शौर्य), १० ‘युध्द सेवा पदक’, ४० ‘सेना पदक’ (विशिष्ट सेवा), ९३ ‘विशिष्ट सेवा पदक’ तसेच लष्कराच्या विविध ऑपरेशनसाठी ४४ पदक आणि नौदलाच्या ८ नौसेना पदकांचा समावेश आहे.

यामध्ये मुळचे महाराष्ट्राच्या असलेल्या लष्कर व नौदलाच्या सेना अधिकारी व जवानांना ३ ‘परम विशिष्ट सेवा पदक’ (पीव्हीएसएम), २ ‘सेना पदक’ (शौर्य), २ ‘सेना पदक’ (विशिष्ट सेवा) आणि ७ ‘विशिष्ट सेवा पदक’ जाहीर झाले आहेत.

तीन सेनाधिकाऱ्यांना ‘परम विशिष्ट सेवा पदक’

लष्काराच्या सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर आणि लेफ्टनंट जनरल मनोज पांडे या लष्काराच्या दोन सेनाधिकाऱ्यांना तसेच नौदलाचे व्हाईस ॲडमिरल सतिशकुमार घोरमाडे यांना सर्वोच्च मानाचे परम विशिष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे.

दोन ‘सेना पदक’ (शौर्य)

१६-मराठा लाईट इन्फेन्ट्रीचे नायक निलेश मल्हारराव देशमुख आणि २४-मराठा लाईट इन्फेन्ट्रीचे शिपाई अण्णासाहेब निंगप्पा दुंडगे यांना ‘सेना पदक’ (शौर्य) जाहीर झाले आहे.

दोन ‘सेना पदक’ (वि‍शिष्ट)

मराठा लाईट इन्फेन्ट्रीचे ब्रिगेडीयर पराग केशवराव नांगरे आणि ८-ग्रेनेडीयरचे कर्नल कौस्तुभ उल्हास केकरे यांना उत्कृष्ट सेवेसाठी ‘सेना पदक’ (वि‍शिष्ट) जाहीर झाले आहे.

सात : ‘विशिष्ट सेवा पदक’

लष्कराच्या सिग्नल रेजिमेंटचे मेजर जनरल कुलभूषण हनुमंत गवास, लष्कराच्या पोस्ट सेवेचे मेजर जनरल वसंत महेश दामोदर, इंटेलिजन्स कॉर्प्सचे कर्नल किरण नारायण कुलकर्णी, लष्कर अभियांत्रिकीचे कर्नल अजय लोंढे आणि आर्मोरेड कॉर्प्सचे लेफ्टनंट कर्नल महेश विष्णु जाधव यांना ‘विशिष्ट सेवा पदक’ जाहीर झाले आहे. तसेच, नौदलाचे कमोडोर विद्याधर हरके आणि कमांडर योगेश आठवले यांनाही ‘विशिष्ट सेवा पदक’ जाहीर झाले आहे.

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाच्या २९ अधिकारी,कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर

जीवाची जोखम पत्करून दिलेल्या असाधारणपणे गुणवत्तापूर्ण सेवा आणि कर्तव्य पार पाडताना प्राप्त केलेली आणि कायम राखलेली उत्कृष्टता यावरील “सेवेतील विशेष प्रतिष्ठित कामगिरी ” साठी प्रशंसा प्रमाणपत्रे आणि पदकांचा समावेश असलेल्या राष्ट्रपती पुरस्कारासाठी सीमाशुल्क कर्मचाऱ्यांचा विचार केला जातो. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हे पुरस्कार जाहीर केले जातात.

यावर्षी, २९ अधिकारी,कर्मचाऱ्यांची “सेवेतील विशेष प्रतिष्ठित कामगिरी ” साठी प्रशंसा प्रमाणपत्रे आणि पदके प्रदान करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. यात महसूल गुप्तचर संचालनालय, मुंबई क्षेत्रीय विभागाचे प्रधान अतिरिक्त महासंचालक, राजेश पांडे, वस्तू आणि सेवा कर गुप्तचर महासंचालनालय, मुंबई क्षेत्रीय विभागाचे वरिष्ठ गुप्तचर अधिकारी, अजित विश्राम सावंत, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर क्षेत्र, पुणेचे अधीक्षक अवधूत बी. खाडिलकर, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर क्षेत्र, मुंबईचे अधीक्षक एस. वेंकट सुब्रमण्यम, महसूल गुप्तचर संचालनालय, मुंबई क्षेत्रीय विभागाचे हवालदार सुर्यकांत काशीराम वझे या महाराष्ट्रात कार्यरत पाच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या या पुरस्कारांमध्ये समावेश आहे.

सर्वाधिक ११५ शौर्य पदके जम्मू-काश्मीर पोलिसांना देण्यात आली आहेत. त्याचबरोबर केंद्रीय राखीव पोलीस दलाला (सीआरपीएफ) ३०, छत्तीसगड पोलिसांना दहा, ओडिशा पोलिसांना नऊ आणि महाराष्ट्र पोलिसांना सात पदके मिळाली आहेत. त्याचप्रमाणे इंडो-तिबेट सीमा पोलीस (आटीबीपी) आणि सशस्त्र सीमा बल (एसएसबी) यांना प्रत्येकी तीन, तर सीमा सुरक्षा दलाला (बीएसएफ) दोन शौर्य पदके मिळाली. ८८ जवानांना विशिष्ट सेवा पदक आणि ६६२ जवानांना गुणवंत सेवा पदक प्रदान करण्यात आले आहे.

Back to top button