प्रजासत्ताकदिनी हल्ल्याची ‘मुजाहिद्दीन’ ची धमकी | पुढारी

प्रजासत्ताकदिनी हल्ल्याची ‘मुजाहिद्दीन’ ची धमकी

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना ‘हिजबुल मुजाहिद्दीन’ ने सर्वोच्च न्यायालयातील एका वकिलाला सोमवारी धमकीचा रेकॉर्डेड संदेश पाठवून प्रजासत्ताकदिनी दिल्लीत हल्ला करून घातपात करण्याचा इशारा दिला आहे. काश्मिरींनी काश्मीर सोडून दिल्लीत आपला झेंडा फडकावण्याचे आवाहनही ‘हिजबुल’ने केले आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिस सतर्क झाले असून, कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

राजधानीत 20 हजार पोलिस कर्मचारी तसेच सशस्त्र पोलिस दलाच्या 65 तुकड्या तैनात करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त राकेश अस्थाना यांनी दिली.

काश्मीरमधून कलम 370 हटविल्याप्रकरणी ‘हिजबुल मुजाहिद्दीन’ ने सर्वोच्च न्यायालयास जबाबदार धरले आहे. या कृतीला मोदी सरकार जितके जबाबदार आहे, तितकेच सर्वोच्च न्यायालयही जबाबदार असून, काश्मिरी नागरिकांनी याविरोधात 26 जानेवारी रोजी दिल्लीत दाखल होऊन काश्मिरी झेंडा फडकावून निषेध करावा, असे आवाहन ‘हिजबुल’ने केले आहे. काश्मिरी नागरिकांचा हा लढा दिल्लीपर्यंत नेण्याचा निर्णय आम्ही घेतला असून, खलिस्तानी दहशतवादी संघटना शीख फॉर जस्टिसने केलेल्या आवाहनाचा संदर्भही ‘हिजबुल’ने दिला आहे.

पन्नूने केले धमकीचे हजारावर कॉल

गेल्या आठवडाभरात अनेक वकिलांना असे धमकीचे कॉल आले आहेत. त्यात प्रजासत्ताकदिन सोहळ्यात व्यत्यय आणण्याचा इशारा देण्यात आला होता. हे कॉल शीख फॉर जस्टिसचा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नूने केले होते. त्यात त्याने आपल्या समर्थकांना 26 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मार्ग रोखण्याबरोबर तिरंगा ध्वज काढून टाकण्याचे आवाहन केले आहे. इतकेच नव्हे, तर पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटीसंदर्भातील सुनावणीपासून दूर राहण्याची धमकीही त्याने न्यायाधीशांना दिली आहे.

दरम्यान, प्रजासत्ताकदिनी हिंसाचार घडवण्याचा काहींचा प्रयत्न असल्याचा इशारा नुकताच भारतातील गुप्तचर यंत्रणांनी दिला होता.

लाल किल्ल्याची सुरक्षा वाढविली

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मिळालेल्या धमक्या आणि गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या अ‍ॅलर्टच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी राजधानीत कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. सरकारी कार्यालये आणि लाल किल्ला परिसरात सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आल्याची माहिती एका अधिकार्‍याने दिली.

Back to top button