नवज्योतसिंग सिद्धू यांना मंत्री करण्यासाठी इम्रान खान यांची शिफारस | पुढारी

नवज्योतसिंग सिद्धू यांना मंत्री करण्यासाठी इम्रान खान यांची शिफारस

नवी दिल्ली/चंदीगड ; वृत्तसंस्था : पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि पंजाब लोक काँग्रेसचे नेते अमरिंदर सिंग यांनी नवी दिल्लीत मोठा खुलासा करताना नवज्योतसिंग सिद्धू यांना मंत्री बनविण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शिफारस केली होती, असे उघड केले आहे. सिद्धूंना तुमच्या सरकारमध्ये घ्या, काम नाही केले तर काढून टाका, असे इम्रान म्हणाल्याचेही अमरिंदर म्हणाले.

कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले की, या प्रकाराने मी अचंबित झाला होतो. मला सांगण्यात आले होते की, सिद्धूंसोबत इम्रान यांची मैत्री आहे. त्यामुळे त्यांना सिद्धूंना मंत्री करायचे आहे. हे सर्व सोनिया गांधी, प्रियांका गांधींच्याही कानावर घातले होते. त्यावर प्रियांका म्हणाल्या की, मूर्ख माणूस आहे, जो अशी शिफारस करतो आहे. सिद्धूंना मंत्री केले. पण 70 दिवसांत एकही फाईल निकाली काढली नाही. 2-3 वेळा बोलावून काम करायचे नसेल तर बाहेर पडा, असे सांगितले.

पंजाबची 600 किलोमीटरची सीमा पकिस्तानला लागून आहे. पाककडून अमली पदार्थ, शस्त्रास्त्रांची तस्करी होत असते. पंजाबवर 3 लाख कोटींचे कर्ज आहे. सुरक्षिततेच्या द़ृष्टिकोनातून पंजाबमध्ये केंद्र आणि राज्य समन्वय असला पाहिजे, असे नड्डा म्हणाले.

भाजप, पीएलसीचे जागावाटप

पंजाबमध्ये भाजप, कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पंजाब लोक काँग्रेस आणि ढिंढसा यांचा शिरोमणी अकाली दल संयुक्त यांच्या आघाडीने जागावाटप जाहीर केले आहे. त्यानुसार भाजप 65 जागांवर लढणार आहे. पंजाब लोक काँग्रेस 37 जागांवर तर ढिंढसांचा पक्ष 15 जागांवर निवडणूक लढत आहे. दिल्लीत याबाबत घोषणा करण्यात आली. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांसह तिन्ही पक्षांचे नेते उपस्थित होते. पंजाबमध्ये मंगळवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे.

मी कॅप्टन अमरिंदर यांच्यासाठी काँग्रेसचे दरवाजे बंद केले होते. त्यांची काँग्रेसने हाकालपट्टी केली. 77 पैकी एकही आमदार त्यांच्यासोबत नव्हता. त्यांची पत्नी खासदार परनीत कौरही त्यांच्या बाजूने नव्हती.
– नवज्योतसिंग सिद्धू, काँग्रेस नेते

Back to top button