उत्तराखंड विधानसभा : बंडखोर नेते देणार भाजपला धक्का

उत्तराखंड विधानसभा : बंडखोर नेते देणार भाजपला धक्का

उत्तराखंड विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता केवळ वीस दिवस बाकी राहिले आहेत. मतदानाची तारीख जवळ येत चालल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र प्रचाराचा धुरळा उडाला आहे. राजकीय पक्षांचे तिकीट वाटपाचे कामदेखील पूर्ण झाले असून चालू आठवड्याच्या अखेरीस उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.

त्यानंतर बहुतांश मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. देवभूमी म्हणून ओळखल्या जाणार्‍या उत्तराखंड विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस, भाजप आणि आम आदमी पार्टी अशी तिहेरी लढती होत आहेत. भाजपने यावेळी अनेक दिग्गज इच्छुक नेत्यांचे तिकीट कापत त्यांना घरचा रस्ता दाखविला आहे, परिणामी त्यातून निर्माण झालेल्या बंडखोरीचा सामना यावेळी पक्षाला करावा लागत आहे.

तिकीट कापल्यानंतर अनेक भाजप नेते पर्यायी पक्षांच्या शोधात आहेत तर कित्येकांनी अपक्ष म्हणूनच मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. हरकसिंग रावत यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने काँग्रेसमध्ये प्रवेश करत भाजपला धडा शिकविण्याचा निर्धार केला आहे. पक्षासाठी अहोरात्र झटून आणि मतदारसंघांत विकासकामे करूनही तिकीट का कापले, याचा जाब नेतृत्वाने दिला पाहिजे, अशी जाहीर मागणी थरालीच्या आमदार मुन्नीदेवी शहा यांनी केली. महेश नेगी यांच्यासह तिकीट कापलेल्या नेत्यांची अशीच अवस्था आहे. काँग्रेस तसेच इतर पक्षांतून आलेल्या नेत्यांना यावेळी भाजपने तिकीट दिले आहे. त्यामुळे प्रस्थापित भाजप नेत्यांत असंतोष दिसून येत आहे.

नरेंद्रनगर मतदारसंघांत तिकीट नाकारल्यानंतर येथील नेते ओमगोपाल यादव काँग्रेसमध्ये जाण्याच्या मनःस्थितीत आहेत. याठिकाणी पक्षाने मंत्री सुबोध उनीयाल यांना संधी दिली आहे. प्रामाणिक नेते आणि कार्यकर्त्यांची भाजपमध्ये कदर राहिली नसल्याचा यादव यांचा आरोप आहे. धनोल्टी मतदारसंघात पक्षाने प्रीतम पवार यांना तिकीट दिले आहे, यामुळे माजी आमदार महावीर रांगड नाराज आहेत. ते अपक्ष म्हणून लढण्याची तयारी करीत आहेत. कर्णप्रयागमध्ये टीका मैखुरी तर घनसालीमध्ये दर्शनलाल हे जुने नेते अपक्ष उमेदवार म्हणून उतरत आहेत. कर्णप्रयागमध्ये भाजपने अनिल नौटीयाल यांना तिकीट दिले आहे.

भीमतालमध्ये तिकीट नाकारल्यानंतर मनोज शहा यांनी पक्षाला रामराम करण्याचा इशारा दिला आहे. येथे भाजपने रामसिंग कैरा यांना संधी दिली आहे. कैरा हे अलीकडेच भाजपमध्ये आले होते. एकीकडे अशा प्रकारे भाजपमध्ये बंडखोरांचा सुळसुळाट झालेला असताना भाजपने मात्र त्याकडे फारसे लक्ष दिलेले नाही. पक्षाने विचारपूर्वक तिकीट वाटप केले असून बंडखोर नेत्यांची नाराजी दूर होईल, असा मुख्यमंत्री पुष्कर धामी व प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक यांचा विश्वास आहे.

आप-काँग्रेसचे मनोबल उंचावले

भाजपमधील सुंदोपसुंदीचा सर्वात जास्त फायदा आम आदमी पार्टी आणि काँग्रेसला होणार आहे. यामुळे अर्थातच या दोन पक्षांचे मनोबल उंचावलेले आहे. काँग्रेसचा विचार केला तर या पक्षाने बहुतांश मतदारसंघांत गतवेळचे उमेदवार कायम ठेवले आहेत. आधी यशपाल आर्य आणि आता हरकसिंग रावत यांच्या प्रवेशाने काँग्रेसची बाजू मजबूत झाली आहे.

हरकसिंग रावत यांना चौबट्टाखाल विधानसभा मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ नेते सतपाल महाराज यांच्याविरोधात उतरवले जाऊ शकते. एका कुटुंबात एक तिकीट हे सूत्र यावेळी काँग्रेसने पाळले आहे. याला अपवाद यशपाल आर्य आणि त्यांचे पुत्र संजीव आर्य. हरकसिंग यांनी सुनेसाठी तिकीट मागितले होते. यावर काँग्रेस कोणता निर्णय घेणार, हे पाहण्यासारखे राहील.

भाजपमध्ये असताना रावत यांनी लँड्सडाऊन, केदारनाथ तसेच डोईवाला या तीन मतदारसंघात तिकीट मागितले होते आणि तिथेच त्यांचे भाजपसोबत बिनसले होते. हरकसिंग रावत यांचा राजकीय इतिहास पक्ष बदलण्याचा आहे. त्यामुळे त्यांची कारकीर्द यावेळी पणास लागली आहे.

– अभिमन्यू कुमार

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news