राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या कार्यकाळात तीन वर्षांनी वाढ : केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय | पुढारी

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या कार्यकाळात तीन वर्षांनी वाढ : केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या कार्यकाळात तीन वर्षांनी वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने आज घेतला. या निर्णयामुळे आयोगाला ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदत मिळणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाची स्थापना १२ ऑगस्ट १९९४ रोजी वैधानिक मंडळ म्हणून झाली होती. संसदेत त्यासाठी कायदा करण्यात आला होता. तीन वर्षासाठी हा आयोग स्थापण्यात आला होता. त्यानंतर आयोगाला वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली होती. २००४ सालापासून हा आयोग सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अखत्यारीत कार्यरत आहे.

अपारंपरिक ऊर्जा विकास संस्थेत भांडवली गुंतवणूक….

दरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतीय अपारंपरिक ऊर्जा विकास संस्थेत (आयआरईडीए) १५००कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचाही निर्णय घेतला आहे. सदर निर्णयामुळे आयआरईडीएला अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात १२ हजार कोटी रुपयांचे अतिरिक्त कर्ज वितरण करता येईल. तसेच सुमारे ३५०० ते ४००० मेगावॅट ऊर्जेची निर्मिती होईल, असे ठाकूर यांनी नमूद केले.

हेही वाचलं का? 

 

 

Back to top button