बंगळूर ; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटक मधील नेतृत्वबदलाला आता जोर आला आहे. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी 22 जुलै रोजी मंत्रिमंडळ बैठक बोलावली आहे. भाजप सत्तेत येऊन दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 26 रोजी विधिमंडळ बैठक बोलावली असून भोजन समारंभही होणार आहे. त्याच दिवशी मुख्यमंत्री येडियुराप्पा राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची भेट घेऊन राजीनामा सादर करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
तीन दिवसांआधी मुख्यमंत्री येडियुराप्पांनी दिल्ली दौर्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यावेळी श्रेष्ठींनी येडियुराप्पांना मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार होऊन इतरांना संधी देण्याची सूचना केली होती. त्यानुसार 26 रोजी होणार्या समारंभानंतर दोनच दिवसांत राजीनाम्याची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे समजते.
सोमवारी दिवसभर निकटवर्तीय मुख्यमंत्री येडियुराप्पा यांची भेट घेत होते. त्यांच्या राजीनाम्याविषयी ते जाणून घेत होते. पत्रकारांशी संवाद साधताना मात्र सर्वजण राजीनाम्याचा विषयच नसल्याचे सांगत होते. पुढील दोन वर्षांनंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. त्याआधी नेतृत्वबदल करणे सोपे नाही. याविषयी पक्षश्रेष्ठींनी कुठेही जाहीर केलेले नाही. शिवाय नेतृत्वबदलावर जाहीर विधाने करणार्यांवर चाप लावलेला नाही. त्यामुळे श्रेष्ठींच्या मनात आहे तरी काय? असा प्रश्न राज्यातील राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे.
मुख्यमंत्री येडियुराप्पा पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार पदाचा राजीनामा देणार आहेत. पण, त्यांचे निकटवर्ती, समर्थक गप्प बसणार नाहीत हे निश्चित आहे.
सध्याच्या राजकीय घडामोडींनुसार मुख्यमंत्री येडियुराप्पा 28 रोजी राजीनामा देणार आहेत. त्यांच्यानंतर हे पद कुणाला मिळणार, याची घोषणा अद्याप झालेली नाही. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, राज्याचे उपमुख्यमंत्री अश्वत्थनारायण, राज्य मंत्रिमंडळातील खाणउद्योग मंत्री मुरुगेश निराणी, भाजपचे राष्ट्रीय मुख्य सचिव सचिव संतोष आदींची नावे मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आहेत.