कोरोना : मुंबई, दिल्लीसह २० महानगरांत संक्रमण दर २० टक्क्यांहून जास्त | पुढारी

कोरोना : मुंबई, दिल्लीसह २० महानगरांत संक्रमण दर २० टक्क्यांहून जास्त

नवी दिल्ली/मुंबई ; वृत्तसंस्था : देशात तिसर्‍या लाटेत ज्या वेगाने दैनंदिन रुग्णसंख्या वाढत आहे, त्यापेक्षा रुग्णसंख्या वाढीचा वेग देशातील मुंबई, दिल्लीसह 20 महानगरांतून कितीतरी पटींनी जास्त आहे. या महानगरांत 20 टक्क्यांहून अधिक संक्रमण दर आहे. या महानगरांत दर 100 चाचण्यांमागे 20 जण कोरोना बाधित आढळत आहेत.

देशात दर लाख लोकसंख्येमागे 19 रुग्ण सध्या कोरोनाबाधित आढळत आहेत. दुसरीकडे दिल्लीतील गुरुग्राममध्ये दर लाख लोकसंख्येमागे 179 रुग्ण आढळत आहेत. कोलकात्यात दर लाख लोकांमागे 157, बंगळुरूला 163, दिल्लीत 139, तर मुंबईत 132 जण बाधित आढळत आहेत.

कोलकाता येथे सर्वाधिक गंभीर परिस्थिती आहे. इथे दर 100 चाचण्यांअंती 60 टक्के लोक बाधित आढळत आहेत. रुग्णसंख्या ज्या वेगाने वाढते आहे, ते पाहता दिल्ली-मुंबईत पुढच्या आठवड्यात तिसर्‍या लाटेचा ‘पीक’ येऊ शकतो, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

महाराष्ट्रात किट विक्रीवर लक्ष

अनेक लोक रुग्णालयात न जाता घरीच कोरोना किटच्या मदतीने तपासणी करत आहेत. त्यामुळे रुग्णांचा नेमका आकडा मिळत नाही. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आरोग्य विभागाने अशा किटच्या विक्रीवर लक्ष ठेवण्याचे आदेश यंत्रणेला दिले आहेत. मुंबईतील मेडिकल स्टोअर्सवरून असे 3 लाख किट विकले गेल्याचे सांगण्यात येते.

मुंबईत दुसर्‍याही दिवशी घट

सलग दुसर्‍या दिवशीही घट नोंदवत मुंबईत शुक्रवारी 11 हजार 317 नवे कोरोना रुग्ण आढळले. शुक्रवारी 14 जानेवारीला 54 हजार 924 चाचण्या करण्यात आल्या. सुमारे 16 हजाराने चाचण्या कमी झाल्यामुळे रुग्णसंख्या घटली असावी. मुंबईत मृत्यूचा आकडा मात्र वाढत असून 24 तासांत 9 जणांचा मृत्यू झाला. त्यात दोघे चाळीशीच्या आतले होते.

Back to top button