पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थान पोटनिवडणुकीत मतदानादरम्यान अपक्ष उमेदवार नरेश मीणा यांनी एसडीएम अमित कुमार चौधरी यांना कानाखाली मारल्याच्या प्रकरणावरून अजूनही गदारोळ सुरू आहे. नरेश मीनाला गुरुवारी (दि.14) अटक करून जयपूरला आणण्यात आले होते. तर एसडीएम अमित कुमार चौधरी यांनी नरेशविरोधात एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी नरेशविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह 10 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. यापैकी 8 कलमे नवीन कायद्यांतर्गत आणि 2 पूर्वीच्या भारतीय दंडसंहितेच्या कायद्यांतर्गत जोडण्यात आली आहेत.
या घडलेल्या घटनेनंतर राज्यातील आरएएस, एएसओ, एसडीएम अमित कुमार चौधरी यांच्या समर्थनार्थ एकत्र आले आहेत. या घटनेप्रकरणी मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची भेट घेण्यासाठी ही संघटना आज सीएम हाऊसमध्ये पोहोचणार आहे. चर्चेनंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. नरेश मीणा यांना अटक करण्याची संघटनेची सर्वात मोठी मागणी होती, जी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार पूर्ण झाली आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कर्मचारी सुरक्षा कायदा करण्याची मागणी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून होत आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष महावीर खराडी यांनी सांगितले की, या संदर्भात शिष्टमंडळ आज सकाळी ९ वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भजनलाल शर्मा यांची भेट घेणार आहे.
अजमेर विभागाचे आयजी ओमप्रकाश सांगतात की, नरेश मीणाविरुद्ध 20 ते 22 खटले सध्या सुरु आहेत. ज्यात त्यांची अटक प्रलंबित आहे. सध्याच्या प्रकरणासंदर्भात त्याच्यावर सार्वजनिक मालमत्तेची नासधूस आणि खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात आणखी 60 जणांचा समावेश असून, त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
एसडीएमला कानाखाली मारण्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी नरेश मीणाला पोलिस न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन जाणार आहेत. मीना यांच्या समर्थकांनी गोंधळ घालू नये यासाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. तरी आजचा दिवस पोलिसांसाठी आव्हानात्मक असेल. दुसरीकडे, सामरावता आणि अलीगड शहरातही एसटीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. काल अटक केल्यानंतर नरेश मीनाला आधी टोंक आणि नंतर पिपलू पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते जेणेकरून कोणत्याही प्रकारचा गोंधळ टाळता येईल.