

पुढारी ऑनलाईन: जम्मूमध्ये नॅशनल कॉन्फरन्सला मोठा झटका बसला आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते अनिल धर यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. 1990 मध्ये खोऱ्यातून काश्मिरी पंडितांच्या पलायनासाठी माजी राज्यपाल जगमोहन मल्होत्रा यांना जबाबदार धरल्याबद्दल त्यांनी पक्ष नेतृत्वावर टीका केली आहे.
अनिल धर यांनी एनसी नेतृत्वाच्या "हिंदूंविरुद्ध जातीय रंग आणि पूर्वग्रह" दर्शविणाऱ्या विधानांवरही आक्षेप घेतला. सोमवारी रात्री उशिरा त्यांनी पक्षाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केला. अनिल धर हे नॅशनल कॉन्फरन्समध्ये जम्मू प्रांताचे उपाध्यक्ष होते. प्रदेशातील कार्यकर्त्यांवर आणि सर्वसामान्यांवर त्यांची मजबूत पकड आहे. पक्षातील सर्वोच्च नेत्यांमध्ये त्यांची गणना केली जात असे.
नॅशनल कॉन्फरन्स हिंदूंमध्ये विश्वास निर्माण करू शकली नाही
पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देताना ते म्हणाले, "हे सांगायला मला अत्यंत दु:ख होत आहे की, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेतृत्वाला आता काश्मिरी पंडितांबाबत रस नाही. नॅशनल कॉन्फरन्सच्या सर्वोच्च नेतृत्वाद्वारे 1990 मध्ये खोऱ्यातून काश्मिरी पंडितांच्या पलायनासाठी माजी राज्यपाल जगमोहन मल्होत्रा हे जबाबदार होते, या नुकत्याच केलेल्या आरोपावरून हे स्पष्ट होते.
धर म्हणाले, "पक्षाच्या भूमिकेने काश्मिरी हिंदूंमध्ये विश्वास निर्माण केला नाही, ज्यांनी गेल्या तीन दशकांमध्ये सर्वात भयानक नरसंहार, छळ आणि हिंसाचाराचा सामना केला आहे. किंबहुना, एनसी उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांच्या अलीकडील विधानांमध्ये सांप्रदायिक रंगछटा दिसून येतात आणि त्यांची हिंदूंबद्दलची पूर्वग्रहदूषित भावना स्पष्ट होते." यामुळेच माझा नॅशनल कॉन्फरन्सवरील विश्वास उडाला आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांना लिहिलेल्या पत्रात धर म्हणाले की, "या सर्व गोष्टी पाहता, माझा नॅशनल कॉन्फरन्सवरील विश्वास उडाला आहे आणि म्हणूनच, 30 वर्षे पक्षाशी संलग्न राहिल्यानंतर, मी आता पक्षाच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा देतो."