नाशिक : गोदा आरतीसाठी श्रावण महिन्याचा अल्टिमेटम

नाशिक : गोदा आरतीसाठी श्रावण महिन्याचा अल्टिमेटम
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आगामी निवडणुकीची जोरदार तयारी भाजपने सुरु केली असून, त्याचाच एक भाग म्हणजे पहिल्या श्रावणी सोमवारपासून गंगेच्या धर्तीवर गोदा आरती सुरु करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. याबाबत आ. देवयानी फरांदे यांनी मह‍पालिका मुख्यालयात अधिकार्‍यांसमवेत 'नमामी गोदा' या प्रकल्पाचा आढावा घेत गोदा आरतीसाठी श्रावण महिन्याचा अल्टिमेटम दिला.

बुधवारी (दि.१४) झालेल्या बैठकीत शहर अभियंता शिवकुमार वंजारी, पाणीपुरवठा अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी, गोदावरी संवर्धन कक्षाचे विजयकुमार मुंढे, नगररचनाचे कार्यकारी अभियंत‍ा संजय अग्रवाल, जलसंपदाचे मुख्य अभियंत‍ा सागर शिंदे, अभियंता सागर पाटील आदींसह नमामि गोदा प्रकल्प सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी आ.फरांदे यांनी नमामि गोदा प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी प्रामुख्याने गोदा आरती हा मुद्दा केंद्रस्थानी होता. पहिल्या श्रावणी सोमवारपासून कोणत्याही परिस्थितीत गोदा आरतीचा श्रीगणेशा झालाच पाहिजे, असा आग्रह त्यांनी धरला. तसेच गोदा आरती कोठे करावी, याबाबत उपलब्ध जागांवर चर्चा झाली. आरतीसाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कालावधीत रामकुंडाकडे येणार्‍या वाहनांना प्रवेश बंद करावा, अथवा या कालावधीत वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी एकेरी मार्ग करावा, यावर प्रामुख्याने मंथन झाले. तसेच या प्रकल्पावर काम करताना गोदाघाट परिसर हेरिटेज वाटावा, अशा पध्दतीने सौंदर्यीकरण करावे, असे सांगत याबाबतचा आराखडा मनपा अधिकार्‍यांनी तयार करावा, अशा सूचना आ.फरांदे यांनी दिल्या. यावेळी सल्लागार समितीने नमामि गोदा प्रकल्पाचा धावता आढावा सादर केला. मलनिस्सारण विभागाने गोदा प्रदूषण थांबविण्यासाठी चेहडी, तपोवन, आगर टाकळी व दसक पंचक एसटीपीचे नुतनीकरण केले जात असल्याची माहिती दिली.

वस्त्रांतरगृह पाडण्याचा पर्याय

पवित्र रामकुंड येथे गोदा आरती करण्यासाठी वस्त्रांतरगृहाचा मोठा अडसर आहे. जागेच्या कमतरतेमुळे या ठिकाणी आरतीसाठी जादा भाविक उपस्थित राहू शकत नाही. त्यामुळे वस्त्रांतर गृह पाडले तर जागेचा अडसर दूर होईल, या पर्यायावर चर्चा झाली. पण या मुद्यावर जिल्हाधिकार्‍य‍ांची समिती नेमली असल्याने वस्त्रांतरगृहाचा मुद्दा बाजूला ठेवण्यात आला.

गोदा नव्हे तर गोदे म्हणा

नमामि गंगेच्या धर्तीवर अठराशे कोटी रुपये खर्च करुन नमामि गोदा प्रकल्प राबवला जात आहे. पण बैठकीत आ.फरांदे यांनी नमामि गोदा या शब्दाला आक्षेप घेतला. नमामि गंगेप्रमाणे नमामि गोदे असा उच्चार करावा, असा आग्रह धरला.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news