महंत शांतिगिरींच्या उमेदवारीने नाशिकच्या आखाड्यात रंगत

महंत शांतिगिरींच्या उमेदवारीने नाशिकच्या आखाड्यात रंगत
Published on
Updated on

एकीकडे महायुती उमेदवाराचा घोळ संपत नसताना दुसरीकडे नाशिकमध्ये जय बाबाजी भक्त परिवाराचे सर्वेसर्वा महंत शांतिगिरी महाराज यांनी सोमवारी शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. मतदार संघात आपल्या हक्काचे लाखो मतदार असल्याचा दावा करण्यात आल्याने त्यांच्या उमेदवारीचा महायुती अन् महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना फटका बसण्याची तसेच निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता गडद झाली आहे.

निवडणूक जाहीर होण्याआधी महायुती तसेच महाविकास आघाडीकडून उमेदवारी गळ्यात पडण्यासाठी शांतिगिरी महाराज यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले होते. जय बाबाजी भक्त परिवाराच्या आग्रहास्तव आपण निवडणूक रिंगणात उतरल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 2009 मध्ये शांतिगिरी महाराज यांनी छत्रपती संभाजीनगर येथून अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी लक्षवेधी मते घेऊन तत्कालीन शिवसेना-भाजप युती उमेदवार चंद्रकांत खैरे यांना विजयासाठी घाम गाळण्याची नामुष्की आणली होती. यावेळी कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीतून माघार न घेण्याच्या महंतांच्या निर्धारामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. स्वच्छ प्रतिमा, आध्यात्मिक पार्श्वभूमी, भक्त परिवारातील पावणेदोन लाख कुटुंबे सोबत असल्याचा दावा, सर्वपक्षीय नेत्यांसोबतचे जिव्हाळ्याचे संबंध या बलस्थानांच्या जोरावर आपण दिल्ली गाठू, असा विश्वास ते व्यक्त करीत आहेत.

धार्मिक परंपरा असलेले नाशिक संत-महात्म्यांच्या अस्तित्वासाठीही लौकिक राखून आहे. इथे रामराज्य आणण्याच्या दृष्टिकोनातून आपण मैदानात उतरल्याचे शांतिगिरी सांगतात. 'लढा राष्ट्रहिताचा.. संकल्प शुद्ध राजकारणाचा' हे ब्रीदवाक्य घेऊन त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे. त्यांच्या दाव्याप्रमाणे केवळ लाख-दीड लाख मतदान जरी त्यांना प्राप्त झाले, तरी ते निर्णायक ठरून विजयाची स्वप्ने पाहणार्‍या महायुती अथवा महाविकास आघाडी उमेदवारांचे समीकरण बिघडू शकते, असा कयास लावला जात आहे.

115 आश्रम, व्यसनमुक्तीसाठी योगदान

संत जनार्दन स्वामी यांचे वारसदार असलेल्या शांतिगिरी महाराज यांचे देशभरात 115 आश्रम अस्तित्वात आहेत. शिवाय, त्यांच्या मार्गदर्शनाखाली सात गुरूकुलांतून हजारो विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षण प्रदान करण्यात येते. अनुष्ठानाच्या माध्यमातून हजारो तरुणांना व्यसनमुक्त केल्याचे श्रेयही शांतिगिरी महाराज यांना जाते. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर त्यांनी आठ दिवस अनुष्ठान केले. निवडणूक अर्ज दाखल करताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात शांतिगिरी महाराज यांच्याकडे मठ, गुरूकुल, शेती, वाहने, निवासी मालमत्ता आणि तत्सम मिळून 38.81 कोटींची संपत्ती असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news