

नाशिक ; पुढारी वृत्तसेवा : राज्यपालांचे नाशिकवर प्रेम आहे. आमंत्रण दिले की लगेचच येतात. तसे त्यांचे माझ्यावरही प्रेम आहे. पण, राजकारणातले काही सांगितले की, ते अजिबातच ऐकत नाहीत, असे म्हणत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना चिमटा काढला.
मग काय राज्यपालांनीही 'भुजबळांच्या नाशिकसाठी अनेक मागण्या आहेत. आकाशातून उल्का जरी पडली तरी ते आमच्याकडेच द्या', अशी भुजबळांची अपेक्षा असल्याचे सांगत जशास तसे उत्तर दिले.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रिकल्चरच्या उत्तर महाराष्ट्र शाखेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महाकवी कालिदास कलामंदिर येथे आयोजित उत्तर महाराष्ट्र विकास परिषदेच्या व्यासपीठावर राज्यपाल आणि पालकमंत्री शनिवारी एकत्र आले आणि उभयतांत चांगलीच जुगलबंदी झाली.
भुजबळ सुरुवातीलाच म्हणाले, राज्यपाल आले म्हणजे महाराष्ट्र सरकारच आले, असे मी मानतो. खरे तर नाशिकचे चांगले क्लायमेट बघून प्रभू श्री रामचंद्र पूर्ण परिवारासह इथे राहिले. माझे तुम्हालाही निमंत्रण आहे. तुम्हीदेखील इथे या, असे आवाहनही भुजबळांनी राज्यपालांना केले.
मध्यंतरी कोरोना आला. आपण सार्यांनी तोंडाला पट्ट्या लावल्या, पण त्यामुळे कोणाचे पैसे द्यायचे असतील, तर पळून जाता येत होतं. मास्कमुळे कोण आले, कोण गेले, कोण भेटले कळतच नाही. राज्यपालांनी मास्क घातला, असे म्हणताच राज्यपालांनी तत्काळ मास्क काढला.
राज्यपालांनी मग उत्तराखंडमधील लोकप्रतिनिधीचा किस्सा सांगितला. तो लोकप्रतिनिधी म्हणायचा जे व्हायला हवं, ते माझ्याच मतदारसंघात! आम्ही म्हणायचो, हा उल्का पडल्या तरी आमच्याकडे द्या म्हणेल. तसंच भुजबळांचं झालं आहे. राज्यपाल म्हणाले की, त्र्यंबकेश्वराची कृपा आहे त्या नाशकात रामाला पुन्हा वनवासाला येण्याची गरज राहणार नाही. या भगतसिंहला राज्यपाल म्हणूनच यावे लागेल. राज्यपाल म्हणून आलो, तर कुटुंबासह येण्याची गरज नसेल.
मराठीतच बोला
मराठीतून भाषण करत असतानाच राज्यपालांना समजावे म्हणून हिंदीत 'प्रभू रामचंद्र की भूमी में…' असे बोलणार्या छगन भुजबळांना राज्यपालांनी मध्येच थांबवत 'मराठीतच बोला', असा सल्ला दिला. त्यावर भुजबळांनी 'राज्यपाल मराठी शिकले वाटतं' असे म्हणताच सभागृहात हंशा पिकला.