

नाशिक (उमराणे) : पुढारी वृत्तसेवा
शेतातील पिकांना विहिरीचे पाणी देत असताना शेतातून गेलेल्या विजेच्या तारांमधील एक तार तुटून तिचा स्पर्श झाल्याने देवळा तालुक्यातील उमराणे येथील प्रवीण सुभाष देवरे ( ३५) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
प्रवीणचे काका शेतातून जात असताना त्यांना शेतात विजेची तार पडलेली दिसली. आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बोलावून घेत त्यांनी वीज ट्रान्स्फाॅर्मरवरून थेट वीजप्रवाह बंद केला. तार प्रवीणच्या मानेजवळ पडलेली दिसल्याने प्रवीणची शारीरिक हालचाल पूर्णपणे बंद झालेली होती. तत्काळ प्रवीणला मालेगाव येथे खासगी हाॅस्पिटलमध्ये दाखल केले असता डाॅक्टरांनी प्रवीण मृत झाल्याचे सांगितले. मालेगाव येथील सरकारी दवाखान्यात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. प्रवीणच्या पश्चात पत्नी व एक नऊ वर्षाचा मुलगा आहे. उमराणे येथील माजी सरपंच व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुभाष देवरे यांचा प्रवीण एकुलता एक मुलगा आहे. सायंकाळी उशिरा शोकाकुल वातावरणात उमराणे अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
हेही वाचा :