नाशिक : विकासकामे मंजुरीसाठी कोट्यवधी घेतले – आ. हिरामण खोसकर

नाशिक : विकासकामे मंजुरीसाठी कोट्यवधी घेतले – आ. हिरामण खोसकर
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने बॅकफूटवर गेलेल्या कॉंग्रेसला मोठा हादरा देणारे विधान त्र्यंबकेश्वर- इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी केले आहे. आ. खोसकर यांनी माजी आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांच्यावर विकासकामे मंजूर करण्यासाठी कोट्यवधी रुपये घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे. पैसे घेऊनही त्यांनी कामे मंजूर केली नाही, आता ते पैसेही परत करत नसल्याची तक्रार त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे. दरम्यान, पाडवी यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

काँग्रेसचे नेते चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर आमदार खोसकरदेखील पक्षांतराच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, आता खोसकरांनी माजी मंत्र्यांवर केलेल्या या गंभीर आरोपामुळे काँग्रेसमध्ये घमासान निर्माण झाले आहे. सत्तेत असताना विकासकामे मिळवून देण्यासाठी पाडवी यांनी कोट्यवधींची माया जमा केली. सत्ता गेल्यानंतर त्यांनी ते पैसे परत करणे आवश्यक होते. आता ते लोकसभेची उमेदवारी लढवणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी हे पैसे परत करावे, अन्यथा कायदेशीर कारवाई करावी लागेल अशा शब्दांत आ. खोसकर यांनी तक्रार केली आहे. यावर पटोले यांनी हे प्रकरण परस्पर सहमतीने मिटवा, असे सांगितल्याचे समोर आले आहे.

आ. खोसकर म्हणाले, विविध विकासकामे मंजूर करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातून जवळपास 5 ते 10 कोटी रुपये दिलेले आहेत. शहरातील एका हॉटेलमध्ये स्वत: जाऊन पैसे पोहोचवले होते. तसेच हे पैसे गरीब ठेकेदार, बांधकाम व्यावसायिकांचे आहेत. पंधरा दिवसांपूर्वी त्यांच्याशी पैशांवरून बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी माझ्याशी भांडण केले. पक्षाच्या वरिष्ठांनी याची दखल घेऊन कारवाई करावी किंवा पैसे परत द्यायला सांगावे तसेच त्यांना पक्षातून काढून टाकावे. यामुळे पक्षाची बदनामी होत असल्याचे खोसकर म्हणाले.

खोसकरांच्या वक्तव्याशी संबंध नाही
एका वृत्तवाहिनीशी बोलताना माजी मंत्री पाडवी यांनी हे आरोप खोडून काढले आहेत. ‌'आमदार खोसकर यांनी केलेल्या वक्तव्याशी माझा काहीही संबंध नाही. ते पहिल्यांदा निवडून आलेले आमदार आहेत. त्यामुळे त्यांना अनुभव नसल्यामुळे ते काय बोलत आहेत, याबाबत त्यांनादेखील कळत नाही. ते काहीही बोलत आहेत', असे स्पष्टीकरण पाडवी यांनी दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news